अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येमध्ये बहुतांशी साधर्म्य असल्याचा दावा करत दाभोलकर हत्येप्रकरणी समीर गायकवाड याची चौकशी करण्याची मागणी सीबीआयच्या वतीने बुधवारी न्यायालयात करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सीबीआयची ही मागणी मान्य करत समीरची कळंबा कारागृहात चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. समीरच्या चौकशीनंतर दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासाची दिशा ठरणार असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान समीरच्या वकिलांनी जामीन मिळावा यासाठी दाखल केलेला दुसरा जामीन अर्ज न्यायाधीश एल. डी. बिले यांनी फेटाळला. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी (दि. २९) होणार आहे.
पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा पूर्ण वेळ साधक चार्जफ्रेम करायला कितीही वेळ लागला तरीही समीरला जामीन देऊन त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करावे असा युक्तिवाद पटवर्धन यांनी केला होता, तर जामीन मिळाल्यावर साक्षीदार व पंचावर दबाव टाकू शकतो. तसेच तो मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रुद्र प्रमाणे फरार होऊ शकतो असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून बुधवारी न्यायाधीश बिले यांनी समीरचा दुसरा जामीन अर्ज फेटाळला.
दाभोळकर हत्येप्रकरणी समीरची चौकशी करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी सीबीआयचे अतिरिक्त आयुक्त एस. आर. सिंग यांनी पुणे न्यायालयात केली होती. बुधवारी सीबीआय तर्फे समीरच्या चौकशीच्या परवानगीबाबतचा अर्ज सरकारी वकील अ‍ॅड. दिलीप मंगसुळे यांनी न्यायाधीश बिले यांच्यासमोर सादर केला. त्यास न्यायालयाने परवानगी देत याबाबतचे आदेश कळंबा कारागृह प्रशासनालाही दिले. यानुसार लवकरच सीबीआयतर्फे समीरचा लेखी जबाब नोंदविला जाणार आहे. पथकाचे एस. आर. सिंग स्वत समीरचा जबाब नोंदविणार आहेत. तसेच सोमवारी (ता. २८) एसआयटी, सीबीआय एकत्रितपणे तपास अहवाल उच्च न्यायालयात सादर करणार आहेत. यानंतर समीरवरील चार्जफ्रेमबाबतची सुनावणी मंगळवारी (ता. २९) न्यायाधीश बिले यांच्या समोर होणार आहे.