कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बॉक्साईट खाणीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामास ते पश्चिम घाटाच्या पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांमध्ये येत असल्याच्या कारणावरून पर्यावरण मंत्रालयाच्या वन सल्लागार समितीने अंतिम मंजुरी नाकारली आहे, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी रविवारी दिली. पर्यावरणप्रेमींच्या लढ्याचे यश म्हणून या यशाकडे पाहिले जात आहे. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात १९ बॉक्साईट खाणी होत्या. तथापि, पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र, न्यायालयीन निवाडे यामुळे यातील १७ खाणी बंद केल्या गेल्या आहेत.

या खाण प्रकल्पाला २००९ मध्ये तत्त्वतः वनमान्यता आणि जानेवारी २०१४ मध्ये केंद्राकडून पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली होती. कंपनीला वन संसाधनांचे अधिकार प्रमाणपत्र मिळाले नसल्यामुळे सुमारे १६ हेक्टरचे वन वळवण्यासाठी अंतिम मंजुरी मिळविण्यात विलंब झाला. कंपनीने अद्याप भाडेपट्ट्यावर कोणतेही खाणकाम सुरू केलेले नाही.

समितीने ३० जुलैच्या बैठकीच्या इतिवृत्तात नमूद केले की त्यांनी या प्रस्तावावर नागपूर येथील वन उपमहासंचालक, प्रादेशिक कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाचे नोडल अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय केला. या टप्प्यावर प्रस्तावावर विचार न करण्याची कारणे म्हणून वन सल्लागार समितीने खाण भाडेपट्टा वैधता, पश्चिम घाटाच्या पर्यावरण-संवेदनशील भागात प्रस्तावित खाणकामावर बंदी आणि संवर्धित राखीव क्षेत्रात खाण भाडेपट्ट्याचे स्थान या मुद्द्यांचा उल्लेख केला.

या प्रस्तावातील तथ्ये तपासल्यानंतर भरपाई वनीकरण क्षेत्रात बदल करण्याचा आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नावे मोगलगड खाण भाडेपट्ट्यासाठी राखीव वनजमिनीच्या १६ हेक्टरच्या वन वळवण्यासाठी टप्पा-२ अंतिम मंजुरी देण्याचा प्रस्ताव सध्या विचारात घेता येत नाही, असे या इतिवृत्तात नमूद केले आहे. या निर्णयावर पर्यावरण अभ्यासकांनी समाधानकारक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यासंदर्भातील अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया कॉन्सर्वेशन ट्रस्टचे संवर्धन संशोधक गिरीश पंजाबी, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य रमण कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील पश्चिम घाटातील खाणकामाचा हा प्रस्ताव केंद्राने नाकारल्याचा आम्हाला आनंद आहे. बॉक्साईट खाणकाम विरोधातील लढाई आम्ही गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ लढत आहोत. या निर्णयामुळे पश्चिम घाटातील सर्व खाणकाम थांबवण्याचा एक आदर्श निर्माण होईल.

देबी गोएंका, कार्यकारी विश्वस्त, कॉन्सर्वेशन ॲक्शन ट्रस्ट

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व तिलारी याला जोडणारा भाग ह अत्यंत मोलाचा भ्रमण मार्ग असून या निर्णयामुळे या मार्गाचे तसेच येथील जैवविविधतेचे रक्षण होऊन जलस्रोत्र, जंगले, वन्यजीव वाचणार आहेत. रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक