कोल्हापूर : शूद्र राजकारण करण्याची मुळीच गरज नसताना दुर्दैवाने ही प्रवृत्ती वाढत आहे. पुढील काळ हा कठीण असला तरी संघर्ष करणे गरजेचे आहे. सारेच दिवे मंदावलेले अशी स्थिती नाही. लोकशाहीतील प्रभावी अशा मतदानाच्या हत्याराने बदल घडवता येणे शक्य आहे, असा दृढ निश्चय मनात धरून वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने डॉ. चौसाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि राज्यघटना’ या विषयावर दिवसभराचे चर्चासत्र येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी निवृत्त कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते डॉ. अशोक चौसाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. चौसाळकर सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, आंतरराष्ट्रीय विषयावर अभ्यासपूर्ण लिहिणाऱ्यांची कमतरता आहे. काहींची मांडणी अशी असते की विषयाचे धड आकलन होत नाही. असा हा गुंतागुंतीचा विषय सुबोध पद्धतीने समजावून सांगण्याची डॉ. चौसाळकर यांची शैली उल्लेखनीय आहे. त्यांचा सत्कार राज्यभरात झाला पाहिजे. डॉ. उदय नारकर यांनी महाराष्ट्राला वैचारिक दिशा देणारे डॉ. चौसाळकर दीपस्तंभ आहेत. मुंबईत त्यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. वेगवेगळ्या तीन सत्रांमध्ये ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, डॉ. विजय चोरमारे, डॉ.भारती पाटील, प्रमोद ओलेकर, दिनकर झिंब्रे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, डॉ. प्रकाश पवार, राधेश्याम जाधव, प्राचार्य नागोराव कुंभार, शिवाजी पाटील आदींनी मांडणी केली. सभेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक विनोद कांबळे यांनी स्वागत, अध्यक्ष भीमराव धुळुबुळू यांनी आभार मानले. कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, उपाध्यक्ष प्रा. गौरी भोगले, डॉ. ओमप्रकाश कलमे आदी उपस्थित होते.
डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, मराठवाड्यातून शिवाजी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत असताना संशोधनाकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला तत्कालीन कुलगुरूंनी दिला होता. त्यानुसार संशोधन या कामावर अधिक भर दिला. नियतकालिकातून प्रबोधनविषयक लेख लिहिण्यावर भर दिला. देशातील धर्मनिरपेक्षता, राज्यघटना, परिवर्तन आदी मूल्यांबाबत सातत्याने मांडणी केली. महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरिरीने सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा आहे.
