कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरदनिष्ठ राष्ट्रवादी, ठाकरे सेनेकडून दावा केला जात असताना कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ ठाकरे सेनेकडे राहतील, असा निर्वाळा बुधवारी  संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी येथे दिला. यामुळे आघाडी अंतर्गत मतदारसंघ नेमका कोणाकडे जाणार हा संभ्रम वाढीस लागला आहे.

गद्दारांना धडा शिकवा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचा मेळावा राजर्षी शाहू स्मारक भवनात पार पडला. दुधवडकर म्हणाले, उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. ज्यांना शिवसेनेने मोठे केले, सत्तेची पदे दिली, आमदार, खासदार केले; त्यांनी शिवसेनेला फसवले. कोल्हापूरचे दोन गद्दार खासदार त्यामध्ये आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवावा.

हेही वाचा >>>सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार

खासदार मातोश्रीवर नेणार कोल्हापुरातील जागेबाबत वेगवेगळे वृत्त प्रसिद्ध होत आहे. उद्धव ठाकरे यांनी  चाचपणी करण्यासाठी सांगितल्याने आज तातडीची बैठक बोलावली आहे. पक्षाने उमेदवार लवकर द्यावा ; दोन्ही खासदारांना घेऊन मातोश्रीवर घेतो, असा शब्द मी तुमच्या भरवश्यावर देत आहे.

तर कोल्हापुरात अडचण

शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अन्यथा कोल्हापुरात अडचण होईल असा इशारा दिला. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता गद्दारांना कधीही स्थान देणार नाही. सत्तेच्या साठमारी पैशाच्या, यंत्रणेच्या साथीने उर्मट बनलेल्या व भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या भाजप, गद्दारांच्या महायुतीला पराभूत करू, असे उपनेते संजय पवार म्हणाले.सहसंपर्कप्रमुख विजय देवणे,असलम सय्यद,जिल्हाप्रमुख वैभव उगले, संजय चौगुले , सुनील शिंत्रे, माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील सरूडकर, उल्हास पाटील  उपस्थित होते.