कोल्हापूर : शहर कोल्हापूर येथील श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या अनुषंगाने, अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या वतीने मूर्तीची पाहणी करण्याकामी वेळोवेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, नवी दिल्ली यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली यांचे कडून मूर्तीची पाहणी करण्यात आली.
मूर्तीच्या पाहणीच्या अनुषंगाने, मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी, मूर्तीची संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत, भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली यांनी अहवाल दिला आहे. अहवालाच्या अनुषंगाने, देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या वतीने २८ मार्च २०२४ रोजी महासंचालक भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली यांना मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करवीर निवासिनी देवीच्या मूर्तीचे संवर्धन दि.१४ ते दि.१५ एप्रिल २०२४ अखेर करण्यात येणार आहे, असे शुक्रवारी सांगण्यात आले.
हेही वाचा…आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात; पंचरंगी लढतीमुळे चुरस वाढली
त्यामुळे श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दि.१४ पासून ते दि.१५ एप्रिल २०२४ पर्यंत दर्शन भाविकांना घेता येणार नाही, यास्तव त्या कालावधीमध्ये भाविकांना उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी केले आहे.