कोल्हापूर : माझ्या विरोधात साखर कारखानदार बहुसंख्य उमेदवार देऊन षडयंत्र करत आहेत. माझा उमेदवारी अर्ज येत्या १५ एप्रिलला दाखल करणार असून प्रस्थापित नेत्यांना या निवडणुकीत जनतेच्या बळावर दोन्ही उमेदवारांना अस्मान दाखवणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. ते शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे कल्पवृक्ष गार्डन येथे संकल्प मेळाव्यात बोलत होते. महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे भूमिअधिग्रहण कायद्यात बदल करून शेतकर्यांना हजारो कोटी नुकसानीत घातले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, ‘माझा उमेदवारी अर्ज येत्या 15 एप्रिलला बैलगाडीतून जाऊन भरणार आहे. शिवसेनेने पक्षात येण्याची अट घातली होती. गेली ३० वर्षे मला जनतेने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. असे असताना मी गद्दारी करून शिवसेनेत कसा प्रवेश करू. लोकसभा निवडणुकीत आमच्या विरुद्ध कारखानदार अशीच लढत होणार आहे. साखर कारखानदारांना माझ्या आंदोलनामुळे ६०० कोटी रूपये शेतकर्यांना जादा द्यावे लागले. त्याचा राग साखर कारखानदार लोकसभेच्या निवडणुकीत काढत आहेत.सत्यजीत पाटलांची उमेदवारी हे त्यांचेच षडयंत्र आहे. शेतकरी जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कशाची भिती नाही. प्रस्थापितांना जनता धडा शिकवून क्रांती घडेल, शक्तिपीठ महामार्गातून शेतकर्यांची २७ हजार हेक्टर जमीन संपादीत करून त्यांना देशोधडीला सरकार लावत असेल तर मी हे सहन करणार नाही. जनता माझ्याच पाठिशी आहे. सत्यजीत पाटील व धैर्यशील माने हे साखर कारखानदारांचे हस्तक आहेत. त्यांना निवडणुकीत धडा शेतकरी धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी वाचा-शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन

प्रा. जालधंर पाटील म्हणाले, सत्यजीत पाटील व धैर्यशील माने हे साखर कारखानदारांचे प्यादे आहेत. एकनिष्ठ सत्यजीत पाटील शिवसेना फुटीवेळी गोव्यात बॅग भरून का गेलते. त्यांच्या हातात झेंडा शिवसेनाचा व दांडा मात्र कॉंग्रेसचा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी लोकांनी २१ लाख ८० हजार रूपये लोकवर्गणी गोळा करून राजू शेट्टी यांना दिली. यामध्ये नांदणी गावाने ११ लाख रूपये दिले. तसेच सावकर मादनाईक, वैभव कांबळे, पोपट मोरे, विठ्ठल मोरे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, जयकुमार कोले, शमशुद्दीन संदे, संदीप राजोबा, श्रीवर्धन पाटील, राम शिंदे, अण्णासो चौगुले उपस्थित होते.