राज्यभरात बहुतांश ठिकाणी एटीएम बाहेर पैसे संपल्याचेच फलक; रिझव्‍‌र्ह बँकेकडून नोटांचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची नसल्याची तक्रार

पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी बँकांच्या एटीएम मशीनमध्ये खडखडाट निर्माण झाला आहे. नोटाबंदीनंतर सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा बँक ग्राहक, व्यापारी, नागरिक यांना पुन्हा नोटाटंचाईची झळ तीव्रपणे जाणवू लागली आहे. एटीएमसमोर ‘रोकड संपली आहे, क्षमस्व’ अशा आशयाचे फलक लटकत आहेत. रोख पुरवठय़ाचे प्रमाण  मागणीपेक्षा कमी असल्याने हा प्रसंग उद्भवल्याचे बँकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा या चारही  एटीएम मशिनमध्ये खडखडाट निर्माण झाला आहे. ज्या एटीएममध्ये रोकड आहे तेथे रांगा दिसतात पण त्या काही वेळा पुरत्याच. कारण त्यातील अल्पशी रोकड काही वेळातच संपते, असा बँक ग्राहकांचा अनुभव आहे.

करन्सी चेस्टकडून पुरेसा रोकड पुरवठा होत नसल्याने एटीएम कोरडी पडल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एटीएममध्ये पसे नसल्याचा प्रकार सर्वात आधी खासगी बँकांसंदर्भात घडला. यानंतर राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकारी बँकांची एटीएम कोरडी पडली. याबाबत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंग चव्हाण म्हणाले, आमच्या बँकांचे एटीएम जास्त नसले तरी रोकड पुरवठ्याची झळ आमच्यासह सर्व बँकांना जाणवत आहे. आमचा ग्राहक हा रोकड विरहित व्यवहाराला सरावलेला नाही. आम्हाला रोकडची गरज असल्याने रिझर्व बँकेने कोटा ठरवून रोकड द्यावा, अशी मागणी केली आहे.

नागपुरात दुष्काळ

नागपूर : नागपुरात नोटांचा तुटवडा जाणवत आहे. नागरिकांना आजही पसे काढण्यासाठी एका एटीएममधून दुसऱ्या एटीएमकडे धाव घ्यावी लागत आहे. नागपुरातील सर्व प्रमुख मार्गावरील आणि बाजारपेठेत असलेले बहुतांश एटीएम बंद आहेत. सुरू असलेल्या मोजक्याच एटीएममधून केवळ चार हजार रुपये निघत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बहुतांश एटीएम बंद तर सुरू असलेल्या एटीएममधून केवळ चार हजार काढण्याचीच मर्यादा घातल्याने नागपूरकरांना पैसे काढण्यासाठी भर उन्हात भटकंती करावी लागली. या बाबत एका बँकेच्या अधिकार्यास विचारणा केली असता त्यांनी नावं न टाकण्याच्या अटीवर नागरिकांनी रोकडरहीत व्यवहारावर भर द्यावा यासाठी हे चित्र उभे केल्या जात असल्याचे सांगितले.

पुण्यात ही रोकड आटली

नोटाबंदीनंतर सुरळीत झालेली सर्वच बँकांची एटीएम सेवा दोन महिन्यांपासून पुन्हा विस्कळीत झाली असून, सद्य:स्थितीत शहरातील सत्तर टक्के एटीएममध्ये खडखडाट आहे. काही बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी अघोषित मर्यादा लागू करण्यात आल्या असून, एका वेळी केवळ चार हजार रुपयेच काढता येतात. एचडीएफसीसारख्या मोठय़ा बँकेचे बहुतांश एटीएम बंद असल्याचे दिसून येते. काही एटीएम केंद्रांना चक्क टाळेच ठोकण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उघडय़ा असणाऱ्या एटीएमवर रक्कम नसल्याचे फलक झळकत आहेत. इतर बँकांच्या सुमारे ४० ते ६० टक्के एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट आहे.

रत्नागिरीत निम्मी एटीएम बंद

रत्नागिरी: रत्नागिरी शहर व परिसरातील ५० टक्क्यांहून जास्त एटीएम केंद्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पैशांचा खडखडाट जाणवत असल्याचे प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करता सांगण्यात आले. शहर परिसरात सुमारे. अडीचशे ते तीनशे एटीएम आहेत. या प्रत्येक केंद्रावर दरररोज सुमारे तीन ते चार लाख रुपये रक्कम लागते. त्यापैकी ७० टक्के केंद्रे बुधवारी बंद होती. शनिवार-रविवार आणि त्यापाठोपाठ बुद्धपौर्णिमेच्या सुट्टीमुळे हा तुटवडा जाणवत असल्याचे काही बँकांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पण अन्य काही बँकांच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही समस्या त्यापेक्षा जुनी आहे.रिझव्‍‌र्ह बँकेकडूनच पुरवठा कमी होत असल्यामुळे एटीएममध्ये पैसे कमी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नाशिकमध्ये ग्राहक त्रस्त

नाशिक : निश्चिलनीकरणानंतर प्रकर्षांने जाणवलेली चलन टंचाईची तीव्रता सात महिन्यानंतरही कायम आहे. लग्नसराई, नव्या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश यासह वेगवेगळ्या कारणांसाठी एटीएमवर येणाऱ्या बँक ग्राहकांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत आहे. शहरातील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट असून पैसे असलेले एटीएम शोधण्यासाठी ग्राहकांना पायपीट करावी लागत आहे. राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या एटीएमची ही अवस्था असताना रोकड टंचाईमुळे जिल्हा बँकेला तर मुख्यालयास थेट टाळे ठोकणे वा शेतकरी व शिक्षकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. १ मेपासून शहर व ग्रामीण भागातील एटीएममध्ये खडखडाट आहे. काही एटीएममध्ये अल्प काळासाठी रोकड असते. त्या ठिकाणी पैसे असल्याचे समजल्यावर ग्राहक गर्दी करतात. यामुळे दोन ते तीन तासात हे एटीएमही रिक्त होते, असा ग्राहकांचा अनुभव आहे. ‘एटीएम’मधून अधिक वेळा पैसे काढल्यानंतर त्यापोटी अधिभार लावला जाणार असल्याने नोकरदार आता वारंवार पैसे काढण्याच्या फंद्यात पडत नाही. वेतन जमा झाले की, महिनाभरासाठी लागणारी रक्कम एकाच वेळी काढली जात असल्याने रोकडचा तुटवडा भासण्याचे कारण पुढे केले जाते.  ‘आरबीआय’ कडून होणारा चलन पुरवठा विस्कळीत झाल्याने जिल्’ाातील एसबीआयची १६६ पैकी केवळ ७० एटीएएम सुरू आहेत. अशीच स्थिती बँक ऑफ महाराष्ट्रासह अन्य राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या एटीएमची आहे.दोन हजार आणि १०० च्या नोटांचा तुटवडा असल्याने रक्कम काढण्यावर र्निबध येतात. अनेक बँकांच्या मुख्य शाखेलगत एटीएममध्ये पैसे असतात, परंतु, इतरत्र एटीएममध्ये पैसे नसतात अशी तक्रार ग्राहकांनी केली. अ‍ॅक्सीस बँकेच्या अधिकाऱ्यांनी कालपर्यंत चलन तुटवडा असल्याचे मान्य केले. परंतु, आता रोकड पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे सर्व बँकांना पुरेशी रोकड मिळाल्याचे सांगितले.

औरंगाबादमध्ये ६५० एटीएममध्ये ठणठणाट

औरंगाबाद : मागणीच्या केवळ ३० टक्केच रोकड उपलब्ध होत असल्याने औरंगाबाद जिल्हय़ातील बँका कशाबशा तासभर चालतात. औरंगाबादला नागपूरहून रोकड पाठविण्याची व्यवस्था रिझव्‍‌र्ह बँकेकडून होते. दोन दिवसांपूर्वी पाठविलेल्या २५ कोटीची रोकड दीड दिवसात संपली. तेव्हापासून शहरातील विविध बँकांच्या ६५० एटीएममध्ये ठणठणाट आहे. बँकेचे व्यवहार चालविणे अवघड जात असल्याचे महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रिय व्यवस्थापक दिनकर संकपाळ यांनी सांगितले. जेवढय़ा रुपयांचे चलन मागितले जाते त्याच्या ३० टक्केही रक्कम मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील बँकेचे रोखीतील व्यवहार सकाळच्या तासाभरात उरकले जातात. बँक कर्मचारी युनियनचे देविदास तुळजापूरकर म्हणाले, ‘पुरेशी रोकड मिळत नसल्याने ग्रामीण भागत रोखपाल आणि ग्राहकांमध्ये खटके उडत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून चलन उपलब्ध नाही. त्यामुळे ‘एटीएम’ बंद आहेत.’ एटीएमच्या बाहेर बसलेल्या रखवालदाराचे काम मात्र वाढले आहे. पैसे उपलब्ध नाहीत, असे दिवसभर सांगणेच प्रमुख काम झाल्यासारखी स्थिती असल्याचे ते सांगतात. केवळ औरंगाबादच नाही तर हिंगोली, उस्मानाबाद, बीड या जिल्हय़ांमध्ये तुरीचे व्यवहार रखडले आहेत. ‘आरटीजीएस’ च्या माध्यमातून रक्कम मिळायला मारामार त्यात ती जमा झाल्यानंतर काढायलाही अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. रोकड व्यवहारांची अडचण होत असल्याचे औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही मान्य केले.

िंपरीत एटीएममध्ये खडखडाट

पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश एटीएम केंद्रात नोटाच उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे. नोटाबंदी झाल्यानंतरची परिस्थिती असल्याचा अनुभव नागरिक नव्याने घेत आहेत. एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून त्यांना पैसे काढण्यासाठी बरेच हेलपाटे मारावे लागत आहेत.

दादर परिसरातील एटीएममध्ये केवळ दोन हजारच्याच नोटा

मुंबई :नोटाबंदीच्या निर्णयाला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही एटीएम केंद्रांवर अजूनही ५००-१००च्या नोटांची चणचण आहेच. दादर या मुंबईच्या मध्यवर्ती बाजारपेठेमधील एटीएममध्ये मोठय़ा प्रमाणात सुटय़ा पैशांचा अभाव आहे. बहुतांश एटीएम केद्रांमध्ये २००० रुपयांची रोकड उपलब्ध असल्याने छोटेखानी व्यवहार करणाऱ्यांच्या व्यवहारांना खीळ बसली आहे. दादर रेल्वे स्थानकात येस बँक, पंजाब नॅशनल बँक, कोटक बँक तर स्टेट बँकेची तीन क्रेंदे आहेत. रेल्वे स्थानकात उतरून मुख्य बाजारपेठेत येणारे बरेच खरेदीदार याच एटीएम केंद्रातून पैसे काढून पुढे खरेदीसाठी येत असतात. मात्र येथील स्टेट बँकेच्या तीनपैकी एक केंद्र वगळता सगळ्याच एटीएम केंद्रांवर ५०० आणि १००च्या नोटांचा अभाव आहे. त्यामुळे येथे केवळ २०००ची रोकड काढता येते. केवळ स्टेट बँकेच्या एकाच केंद्रात ५०० आणि १००ची रोख उपलब्ध असल्याने संपूर्ण भार या एकाच केंद्रावर पडत आहे. मुंबईच्या रेल्वे स्थानकांमध्ये असणाऱ्या सर्वच एटीएम केद्रांवर ५००-१००च्या नोटांची चणचण आहे. तसेच दादर पश्चिमेकडील केळकर रस्तावरील एसबीआय आणि इंडसइंड बँकमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने दादरमधील कपडे खरेदी दुकानांमध्ये रांगा लागल्या आहेत. मात्र बहुतांश दुकानदारांनी रोकडविरहित व्यवहारांना प्राधान्य दिले आहे. कामावरून घरी परतताना मी दादरच्या भाजीबाजारातून भाजी घेऊन जाते, मात्र एटीएममध्ये १००च्या नोटांचा खडखडाट असल्याने कित्येकवेळा भाजीवाला २०००चे सुट्टे देण्यास नकार देत असल्याने सुटय़ापैशांच्या अभावी रिकाम्या हाताने परतावे लागते, असे शलाका पाटील यांनी सांगितले. चलनबंदीच्या निर्णयाला इतके दिवस उलटूनही दादरमधील एटीएम केंद्रांची परिस्थिती अजूनही जैसे थे आहे, असे दादरमधील सुनंदा जोशी यांनी सांगितले.

ठाणे, डोंबिवली, बदलापूरमध्ये नागरिकांचे हाल

ठाणे : निश्चलनीकरणाला अनेक महिने उलटूनही एटीएममधील रोकडटंचाईमुळे नागरिकांची धांदल उडत असून ठाणे, डोंबिवली, बदलापूरसारख्या शहरांत मोक्याच्या ठिकाणी असलेली केंद्रे चक्क बंद अवस्थेत असल्याचे पाहून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळू लागले आहे. एटीएम मशीन नादुरुस्त असणे, पैसे संपणे असे फलक शहरातील जवळपास ९० टक्के एटीएम केंद्रांबाहेर लावण्यात आले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून ठाण्यात हे चित्र वारंवार नजरेस पडत आहे.  नागरिकांना किरकोळ रकमेसाठीदेखील बँकेत जाऊन पैसे काढण्याखेरीज पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे. ठाण्यातील गोखले रोड, रेल्वे स्थानक परिसर, नौपाडा भागातील एटीएम गेल्या आठवडाभरापासून बंद असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवस सुरळीत पैसे एटीएममध्ये उपलब्ध झाल्यावर पुन्हा एटीएम यंत्रणा नादुरुस्त किंवा पैसे संपल्याचे फलक एटीएमबाहेर लावण्यात येतात. डोंबिवली रेल्वे स्थानकातील बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, तसेच एसबीआयच्या एटीएममध्ये बुधवारी रात्रीपासूनच पैसे उपलब्ध नव्हते. तसेच टिळक नगर, रामचंद्रनगर या परिसरांतदेखील एटीएमला कुलूप असल्याने पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. गेल्या पंधरवडय़ापासून अंबरनाथ, बदलापूर तसेच जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातही हीच परिस्थिती दिसत आहे.

लाचेच्या भरमसाठ मागणीचा फटका?

निश्चलनीकरणानंतर रोकडरहित व्यवहाराला चालना मिळेल, असा केंद्र सरकारचा दावा राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांनी फोल ठरविला आहे. विकासकांना चटईक्षेत्रफळाचे वाटप करण्याचे अधिकार असलेल्या महापालिका, म्हाडा तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात रोख स्वरुपात लाचेची वाढलेली भरमसाठ मागणी मुंबईत रोकड टंचाई निर्माण होण्यास कारणीभूत होऊ शकते, असे सूत्रांना वाटत आहे. विकासकांना वितरीत करावयाच्या विविध परवानग्यांपोटी पालिका, म्हाडा तसेच झोपु प्राधिकरणात प्रति चौरस फूट लाच आणि तीही रोकड स्वरुपात घेण्यात येते. निश्चलनीकरणानंतरही लाचेची मागणी कमी झाली नव्हती. मात्र ती सोन्याची बिस्किटे, धनादेशस्वरुपात घेण्यात आली होती. आता रोकड उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा या यंत्रणांनी रोख रकमेवरच भर दिला आहे. म्हाडात एका गृहप्रकल्पाला प्रोरेटा चटईक्षेत्रफळाचे वाटप करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने चक्क सात कोटी रुपये रोखस्वरुपात घेतले. या प्रकल्पात जे अतिरिक्त चटईक्षेत्रफळ उपलब्ध झाले त्यासाठी १२ कोटीच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. परंतु तडजोडीनंतर सात कोटी स्वीकारण्यात आले. पालिकेतही किमान ५० ते ६० लाख ते तीन-चार कोटी लाच रोख स्वरुपात स्वीकारली जात आहे. झोपु प्राधिकरणातही रोख स्वरुपातच लाचेची मागणी केली जात आहे.

‘सध्या एटीएम केंद्रांत मुद्दामच कमी रक्कम ठेवली जात आहे. तिथे पैसे न मिळाल्यास नागरिक बँकेमध्ये येतात. पण, बँकेत ठरावीक वेळेलाच पैसे मिळतात. एकूणच या प्रकारांमधून नागरिकांना रोकडरहित व्यवहार करण्यास भाग पाडले जात आहे. मात्र, अशा पद्धतीने नागरिक रोकडरहित व्यवहाराकडे वळणार नाहीत.  पुण्यातील एक बँक अधिकारी