कोल्हापूर : महाराष्ट्राच्या बदललेल्या वाचनसंस्कृतीचे चित्र दलित साहित्यामध्ये प्रतिबिंबित झाले आहे. दलित साहित्याने भारतीय साहित्याचा पैस वाढवला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती सन्मान विजेते ज्येष्ठ लेखक प्रा. शरणकुमार लिंबाळे यांचे ‘भारतीय समाजवास्तव: लेखक व लेखनदृष्टी’ या विषयावरील व्याख्यान आणि विशेष सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

डॉ. गवस म्हणाले, दलित साहित्य ही भारतीय साहित्याला लाभलेली देणगी आहे. आंबेडकरी विचारविश्वाचा आविष्कार आणि वर्तमानाची उलटतपासणी लिंबाळे यांच्या साहित्यात आल्याने ते भारतीय स्तरावर पोहोचले.

साहित्यिक प्रा. शरणकुमार लिंबाळे म्हणाले, आपल्या भोवतालचे वातावरण अस्वस्थ करणारे आहे. आपल्या भाषेवर सांस्कृतिक साम्राज्यवाद आक्रमण करतो आहे. अशा काळात साहित्य हे सांस्कृतिक संवाद निर्माण करणारे असते. लेखकाने सामाजिक भान ठेवून तसेच निर्भय होऊन लिहायला हवे. अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, आज माणसांच्या संवेदना संपत चाललेल्या आहेत. व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमे आपल्यासमोर आहेत. अशावेळी समाजाकडे डोळसपणे पाहून साहित्याने समाजाचे मूलभूत प्रश्न मांडले पाहिजेत. डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी प्रास्ताविक, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत, प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन, डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले.