कोल्हापूर : ‘नितेश राणे यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्याकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही गांभीर्याने पाहिले पाहिजे,’ असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ‘गणपतीच्या मिरवणुकीमध्ये विघ्न आणत असाल, तर मोहरमच्या मिरवणुकीवेळी तसेच प्रत्युत्तर मिळेल,’ असे विधान आमदार नितेश राणे केली यांनी केले आहे. त्याबाबत मुश्रीफ बोलत होते. ‘राज्यामध्ये हिंदू-मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहिला आहे. अनेक गणेश मंडळांमध्ये मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते सहभागी असतात. गणपती, मोहरम असे सण एकत्रित साजरे केले जातात. या ऐक्याला कोणी गालबोट लागता कामा नये,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> केशवराव भोसले नाट्यगृह आगीचा न्यायसहायक विज्ञान विमा कंपनीकडून आढावा

कोल्हापूर शहरातील रस्ते खूपच खराब झाले आहेत. याचा वाहनचालकांना त्रास होत आहे. याबाबत छेडले असता, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची माफ मागितली. ‘गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते व्यवस्थित व्हावे यासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळातून निधी देता येईल का हे पाहतो,’ असेही त्यांनी सांगितले. केशवराव भोसले नाट्यगृहास आग लागूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, याकडे लक्ष वेधले असता, मुश्रीफ म्हणाले, ‘केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणी पोलिसात नोंद केली असल्याचे महापालिका आयुक्तांनी मला सांगितलेले आहे.’ तथापि, या प्रकरणी पोलिसांमध्ये केवळ जळित या नावाने नोंद झालेली आहे. याबाबत एफआयआर दाखल झालेली नाही, हे निदर्शनास आणून दिल्यावर, ‘आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी २० कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाहणीनंतर घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये वस्त्र निर्मितीची प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनीने कामावरून काढून टाकल्याचा मुद्दा उपस्थित करून येथील काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या कामगार आंदोलकांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमले. त्यांना पोलिसांनी रोखून ठेवले. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी हा मुद्दा मुश्रीफ यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावर ते म्हणाले, ‘कंपनीतील शंभर कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून अचानक काढून टाकले आहे. गेली आठ-दहा वर्षे ते या कंपनीत काम करत आहेत. कायम नोकरीत ठेवावे, अशी मागणी त्यांनी व्यवस्थापनाकडे केली आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांना अचानक कामावरून काढून टाकले आहे, ही कंपनीची चूक आहे. यामुळे आता कंपनीच्या मालकाला अटक करून हा प्रश्न सोडवला पाहिजे.’