कोल्हापूर : इचलकरंजीतील शहापूर भागात आठवडा बाजारासह यात्रा काळात वापरली जाणारी जागा सोडूनच उर्वरित साडेपाच एकर जागेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत गट नं. ४६८ मधील जागामोजणीसाठी शहापूर ग्रामस्थांनी सहकार्य करावे. मोजणीनंतर शहापुरातील प्रमुख प्रतिनिधी यांची पुन्हा एक बैठक घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एका बैठकीवेळी सांगितले.
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील शहापूर परिसरातील शासन मालकीच्या गट नं. ४६८ या जागेत राज्य शासनाकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याच जागेत अनेक वर्षांपासून शहापूरचे ग्रामदैवत श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचे मैदान भरवले जाते. त्याचबरोबर याच जागेत आठवडा बाजार भरविला जातो.
शिवाय या परिसरात मेघराज मंदिर व विनायक हायस्कूल असल्यामुळे या जागेवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नको अशी भूमिका घेत शहापुरातील काही लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी घेत त्याला विरोध दर्शविला आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन केले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगले व शहापूर भागातील माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
या वेळी आमदार आवाडे यांनी या जागेत पूर्वीपासून असलेला आठवडी बाजार, यात्रेनिमित्त होणारे कार्यक्रम यांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. आठवडा बाजार, विनायक हायस्कूल, मेघराजा मंदिर हे सर्व सोडून उर्वरित साडेपाच एकर जागेत परिवहन कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. या कार्यालयामुळे दररोज ३०० ते ४०० वाहनांना परवाना घेतला जात आहे.
तसेच इतर वाहनांशी संबंधित परवानगी व अन्य कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. आरटीओ कार्यालय बाहेर गेल्यास त्याचा सर्वांत जास्त त्रास शहरवासीयांना होणार आहे. त्यामुळे कायम भरणाऱ्या आठवडा बाजारासह कोणत्याही कारणाला धक्का न लावता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यात येणार असल्याबद्दल भूमिका स्पष्ट केली.
माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांनी, गट नंबर ४६८ मधील जागेत परिवहन कार्यालय उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे पूर्व प्रस्ताव माणगाववाडी येथे कार्यालय नेण्याची मागणी केली. माजी नगरसेवक किसन शिंदे यांनी, आठवडा बाजार, कुस्ती मैदान, मेघराजा मंदिर विनायक हायस्कूल यांना धक्का न लावता उर्वरित जागेत आरटीओ कार्यालय उभारले जाणार असेल तर विरोध नसेल, त्याचे समर्थन करतो, असे सांगितले.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी, प्रथम जागेची मोजणी होऊ दे. जागेच्या मोजणीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. या जागेवर सध्या काय आहे आणि नेमकी जागा किती आहे हे मोजणीअंती स्पष्ट होणार आहे. कोणीही मोजणीला विरोध करू नये, असे सांगत गावातील लोकप्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी, महानगरपालिका अधिकारी यांच्या समवेत मोजणी करण्यात येईल. मोजणीनंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल. तोपर्यंत कोणीही विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करू नये, असे आवाहन केले.
बैठकीत तहसीलदार महेश भिलारे, दत्तात्रय शिर्के, सिटी सर्वेच्या अधिकारी कल्पना मुंडे, मंडल अधिकारी राजाराम बावणे, तलाठी गणेश सोनवणे, कोतवाल नेताजी पाटील, रतन वाझे, नितीन कोकणे, दिलीप पाटील, प्रधान माळी, दादा भाटले, पंकज कांबळे, पांडुरंग सोलगे, सचिन हेरवाडे, अशोक चव्हाण, राजू कबाडे, रणजित आनुसे, सचिन राणे, खंडू कांबळे आदी उपस्थित होते.