कोल्हापूर : सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर पर्यटक ,भाविकांनी फुलले आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी ६८ हजार ९१२ तर शनिवारी ७४ हजार १०७ भाविकांनी पहाटे पाच ते सायंकाळी सात या वेळेत दर्शन घेतले. रात्र झाली तरी मंदिरातील भाविकांची गर्दी हटत नव्हती.
काल प्रजासत्ताक दिन होता तर शनिवार, रविवार अशी शासकीय सुट्टी आहे. सलग सुट्ट्या आल्या की कोल्हापूरमध्ये भाविक, पर्यटक यांची गर्दी होत असते. आताही असेच चित्र कोल्हापूरसह जिल्ह्याच्या प्रेक्षणीय, पर्यटन स्थळी पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा-मराठा आरक्षण निर्णयाबद्दल कोल्हापूरात भाजपचा आनंदोत्सव
महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग दिसत आहे. भवानी मंडप आवारात दुतर्फा रांगा लागल्या. कोल्हापूरसह जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूरसह अन्य पर्यटन स्थळांवर गर्दी झाली. पर्यटक, भाविकांची पावले कोल्हापूरकडे वळली आहेत. रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस, कणेरी मठ, खिद्रापूर, जोतिबा आणि पन्हाळा येथेही गर्दी झाली आहे.