कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. २० तासाच्या तपासणीनंतर अधिकाऱ्यांचे पथक सायंकाळी बँकेतून बाहेर पडले. त्यांनी पाच अधिकारी व काही कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याने चिंता वाढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या महिन्यात मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी छापा टाकला होता. आता त्यांनी मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेकडे मोर्चा वळवला आहे.

बँक अधिकारी, कागदपत्रे ताब्यात

काल सकाळी दहा वाजल्यापासून संचनालयाचे पथक बँकेच्या प्रधान कार्यालयासह काही शाखांमध्ये कागदपत्रांची पाहणी करत होते. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. आज सकाळपासून बँकेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी पुन्हा चौकशी केली. सायंकाळी पथक परतले. तेव्हा बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे तसेच बँकेतील पाच अधिकारी ताब्यात घेतले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अंमलबजावणी संचालनायाच्या पथकाने बँकेतील अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दीर्घकाळ चौकशी केल्याने बँकेतील अधिकारी शिणले होते. त्यांना विश्रांती न देता समन्स द्वारा ताब्यात घेतले असल्याचा निषेध कर्मचारी संघटनेने केला. त्यांनी ‘ इडी मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या.