मुस्लीम धर्मीयांचा सर्वात मोठा सण ईद–उल–फित्र अर्थात रमजान ईद करवीरनगरीत उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी गुरुवारी सकाळी सामूहिक नमाज पठण केले. नमाज पठणासाठी शहरातील आबालवृद्धांनी ईदगाह आणि मशिदींचा परिसर फुलून गेला होता. अल्लाहविषयी कृतज्ञता व्यक्त करत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. अन्य धर्मीयांनीही या आनंदोत्सवात सहभाग घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
बुधवारी चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्याने हिलाल कमिटीने गुरुवारी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज ईद करण्यासाठी मुस्लीम धर्मीयांनी तयारी केली. दसरा चौकातील मुस्लीम बोìडगच्या मदानावर सकाळी साडेनऊ वाजता सार्वजनिक नमाज पठणाला सुरवात झाली. पावसाने दोन दिवस उघडीप दिल्याने मदानात चिखल झाला नव्हता. यामुळे मुस्लीम बांधवांनी विनासायास नमाज पठण केले. समाजातील तसेच अन्य मान्यवरांनी या वेळी उपस्थिती लावली.
मुफ्ती इर्शाद कन्नूर यांनी पहिल्या जमातीची नमाज व खुतबा पठण केले. परंपरेप्रमाणे त्यांच्या पाठोपाठ सर्व समाजबांधवांनी नमाज अदा केली. मध्यवर्ती भागासह उपनगरांमधूनही नागरिकांनी या कार्यक्रमासाठी गर्दी केली. मुस्लीम बोìडग मदानातील मुख्य नमाजानंतर शहरातील सर्व मशिदी व दग्र्यामध्ये नमाज पठणास सुरवात झाली. इचलकरंजी येथे मदानाबाहेरील रस्त्यावरही मुस्लीम भाविकांनी नमाज पठण केले. शहरातील लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक क्षेत्रासह पोलिस व प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.