महापालिकेच्या अंदाजपत्रकातील भांडवली खर्चाच्या २५ टक्के रक्कम  पर्यावरणाच्या कामावर कोणत्याही परिस्थितीत खर्च झालीच पाहिजे, अशा शब्दांत फटकारत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समज दिली. निधीच्या मोठय़ा अपेक्षेने गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांची शिष्टमंडळाची बोळवण केली.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालयाने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आवश्यक ते उपाय तातडीने करण्यासाठी आदेश दिले असले तरी त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. प्रदूषण रोखण्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बैठक आयोजित केली होती. महानगरपालिका प्रशासनाने प्रदूषण निर्मूलनासाठी सुरू केलेल्या कामांची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, दुधाळी सांडपाणी प्रकल्पाचे सुरू असलेले काम यासह शहरातील बारा नाल्यांचे सांडपाणी रोखण्याबाबतच्या नियोजित कामाची माहिती आयुक्तांनी सांगितली.
त्यावर पर्यावरणमंत्री कदम यांनी प्रदूषण रोखण्यासंदर्भात पर्यावरणाच्या कामांसाठी महापालिका प्रत्येक वर्षी किती खर्च करते, २०१४-१५ सालात पर्यावरणाच्या कामासाठी किती रकमेची तरतूद केली होती, त्यापकी किती खर्च केली याची माहिती द्या, अशी मागणी केली; परंतु यासंदर्भात कोणतीही माहिती अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नसल्याने  कदम यांनी सविस्तर माहिती देण्याची  निर्देश दिले. पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी माहिती घेऊन ती सचिवांना दिली.
महानगरपालिकेने गतवर्षी  ३१२ कोटींची तरतूद भांडवली खर्चासाठी केली होती; परंतु महापालिकेला उत्पन्न कमी मिळाल्यामुळे आतापर्यंत भांडवली कामांवर १२३ कोटी खर्च केले असून त्यापकी २३ कोटी हे पर्यावरणाच्या कामांवर खर्च करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी इचलकरंजी नगरपालिका प्रदूषण रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या भुयारी गटार योजनेची माहिती मंत्री कदम यांनी घेतली. या बठकीस आयुक्त पी. शिवशंकर, जलअभियंता मनीष पवार, उपजल अभियंता सुरेश कुलकर्णी, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील आदी उपस्थित होते.