कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. तथापि उत्साही कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी झाला असल्याचे सांगत अभिनंदनाचे फलक उभारले गेले आहेत. शाहूवाडी तालुक्यात ठाकरे सेनेचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर हे विजयी झाल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. पाठोपाठ त्याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीकडून शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने हे विजयी झाल्याचे बॅनर उभारण्यात आले आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात बहुरंगी लढत झाली. खरा सामना हा खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यामध्ये होता. गेले महिनाभर प्रचाराची राळ उठली होती. यामुळे या मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. मतदानाची टक्केवारी वाढली असल्याने त्याचा फायदा कोणाला याची चर्चा होत असून त्यावरून पैजाही लागल्या आहेत. समाज माध्यमात आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा केला जात आहे.

आणखी वाचा-कोल्हापूर शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांच्याकडून पत्रकारास मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण आता समाज माध्यमातील दावे प्रत्यक्ष रस्तोरस्ती दिसू लागले आहेत. मतदान पार पडल्यानंतर शाहूवाडी तालुक्यात सत्यजित पाटील सरूडकर हे विजयी झाल्याचे बॅनर उभारण्यात आले आहेत. त्यावर त्यांचे अभिनंदन करणारा संदेश लिहिण्यात आला आहे. या बॅनरची जोरदार चर्चा होत असताना आता त्याला प्रत्युत्तर महायुतीकडून दिले जात आहे. शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने हेच लोकसभा निवडणुकीत विजयी होणार असल्याचे फलक आता पन्हाळा तालुक्यामध्ये उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही फलकबाजी आणखी किती काळ चालणार आणि प्रत्यक्षात निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याचे कुतूहल निर्माण झाले आहे.