राज्याच्या कर्जमाफीच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यावरही शेतकरी नेत्यांनी आपली नाराजी कायम ठेवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य प्रचारप्रमुख संजय कोले, किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांनी निर्णयाविरोधात टोकाचा सूर लावला. शेट्टी यांनी तर पुढील महिन्यात या प्रश्नावर आंदोलनाला सुरुवात करण्याची घोषणाच केली असून अन्य नेत्यांनी सुकाणू समितीच्या बठकीतील निर्णयानंतर काय करायचे ते ठरवू, असा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानीचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच शासन शेतकरी हितासाठी कटिबद्ध असल्याचे कृतिशीलपणे दाखवून दिल्याचे सांगितले.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दीड लाखपर्यंतची कर्जमाफी पुरेशी नसल्याचे सांगून निर्णयावर नाराजी व्यक्त केली. आत्महत्यांच्या कडय़ावर असलेल्या शेतकऱ्याला दीड लाखाची कर्जमाफी काहीच उपयोगाची नाही. जलयुक्त शिवार, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते यामध्ये बोगस कामे होत असून त्यावर अब्जावधी रुपये खर्ची पडत आहेत. मात्र कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडे १ लाख कोटी देणार नसाल तर हे पाप कोठे फेडाल, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांनी शासनाने फसवणूक केल्याचा आरोप केला. शासन जाहीरपणे सरसकट कर्जमाफी करणार असे सांगत होते. सुकाणू समितीला तसा  शब्द देऊनही आपली चाल मात्र उलटय़ा दिशेने ठेवत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फसवण्याचा उद्योग मुख्यमंत्र्यांनी केला आहे. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा असल्याचे मत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य प्रचार प्रमुख संजय कोले यांनी व्यक्त केले.

शेट्टी – खोत यांच्यात मतभेद कायम

शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयावरूनही खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील पक्षाचे सहकारी सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेद कायम राहिले. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीतील  आकडेवारी संशयास्पद असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देशातील  कर्जमाफी ५२  हजार कोटींची असेल असे म्हटले होते. तर राज्याने जाहीर केलेली ३४ हजार कोटींची आकडेवारी संशयास्पद असणार हे उघड आहे. कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.  शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे, अशा शब्दांत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी निर्णयाचे मनापासून स्वागत केले. ४० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करून त्यांचा सात बारा कोरा करण्याचा निर्णय करून यापूर्वी कधीही झाली नाही इतकी मोठी कर्जमाफी या  शासनाने केली आहे. हे राज्य शेतकऱ्यांचे आहे हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करण्यात शासनाला यश आले असल्याने शेतकरी शासनासोबत राहतील.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers leaders not happy with 34 thousand crore loan waiver to maharashtra farmers
First published on: 25-06-2017 at 01:02 IST