कोल्हापूर : उद्या, बुधवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी कोल्हापूरसह अवघा जिल्हा सज्ज झाला आहे. गणरायाच्या पूजेसाठी साहित्याच्या खरेदीसाठी पूर्वसंध्येला बाजारात मोठी गर्दी झाली होती.
सुखकर्ता, बुद्धिदाता गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर गेली काही दिवस तयारी करीत होते. लाडक्या गणरायाला घरी आणण्यापूर्वी घरोघरी आरास करण्यात येत आहे. गणेशाच्या आगमनाला आता काही तासच शिल्लक राहिल्याने आराशीच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले होते.
घरगुती सजावटीसाठी मखर, सिंहासन, तयार पाना-फुलांच्या माळा, विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या माळांनी बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. बाजारपेठेतील हे साहित्य लोकांना आकर्षित करत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत साहित्यांची रेलचेल दिसू लागली आहे. गौराई, शंकराच्या मुखवट्यांचे स्टॉल दिसू लागले आहेत. महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाइन, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी येथे खरेदीसाठी झुंबड उडाली होती. गणरायाच्या स्वागतासाठी करवीरनगरी सजली आहे. मंडळाच्या उत्सवाच्या प्रांगणात तयारीवर शेवटचा हात फिरवला जात होता.
पाण्याची ओरड कायम
रविवारी निम्मे कोल्हापूर पाण्यासाठी भटकत राहिले. गणरायाच्या आगमनाच्यावेळी सुद्धा कोल्हापूर महापालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळे पाण्याची ओरड कायम होती. काळम्मावाडी येथील एका पंपाचे व्हीएफडी कार्ड खराब झाल्याने उंचावरील भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. दुरुस्तीचे काम रात्रीपासून सुरू होते. चाचणी झाल्यावर पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
इचलकरंजीत जनजागरण रॅली
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ‘आवाजाच्या भिंती’ व प्रखर विद्युतझोताचा (लेझर लाइट) अतिरेकी वापर वाढत आहे. यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी इचलकरंजीत जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही रॅली माई टी.बी. क्लिनिकपासून सुरू होऊन शिवतीर्थ, मलाबादे चौक, प्रांत कार्यालय येथे निवेदन देऊन पार पडली. डॉ. अमित देशमुख यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. पी. मर्दा, डॉ. गोविंद ढवळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा, उद्योगपती शामसुंदर मर्दा, बजरंग लोणारी यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.
रॅलीत मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर्स, मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी, डेंटल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, इचलकरंजी नागरिक मंच, रोटरी क्लब ऑफ सेन्ट्रल, रोटरी क्लब, अंधश्रद्धा निर्मूलन संघ, ज्येष्ठ नागरिक मंच, सी ए असोसिएशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, राष्ट्र सेवा दल, बजरंग दल, माई महिला मंडळ आदी सामाजिक संस्था तसेच सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह ५० पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते. नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले.