चित्रपट जगतातील तारकांच्या सहभागामुळे लक्ष्यवेधी ठरलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षकि निवडणुकीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले असून नऊ आघाड्यांमध्ये लढत होणार आहे .  जेष्ठ अभिनेते – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह १२ अपक्षांसह ९ पॅनेलचे १०८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पॅनेलसह, उमेदवारांना निवडणूक समितीचे अध्यक्ष अॅड. के. व्ही. पाटील यांनी निवडणूक चिन्हांचे वाटप  केल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे .
उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यापासून सर्व सभासदात सात पॅनेल होणार अशी चर्चा होती. अभिनेते महेश मांजरेकरही स्वतंत्र पॅनेल करतील अशीच हवा होती. माघारी अर्ज प्रक्रियेनंतरचे चित्र वेगळेच होते. प्रत्यक्षात सात नाही तर ९ पॅनेल जाहीर झाले. मांजरेकर यांनी अपक्ष राहून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणेच इष्ट मानले.
निर्माता, माजी अध्यक्ष विजय कोंडके यांचे ‘कोंडके पॅनेल’, माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांचे ‘शक्ती पॅनेल’,  विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांचे ‘क्रियाशील’, मेघराज भोसले यांचे ‘पतंग’, मोहन िपपळे यांचे ‘दादासाहेब फाळके’, दीपक कदम यांचे ‘परिवर्तन’, लक्ष्मीकांत खाबिया यांचे ‘संघर्ष’, विजय सावंत यांचे ‘माय मराठी’, रणजित मिणचेकर यांचे ‘राजर्षी शाहू सिने’ अशा ९ पॅनेलसह १२ अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.  nini
या वेळी निवडणूक समितीचे अॅड. प्रशांत पाटील, पद्माकर कापसे, आकाराम पाटील यांच्यासह चित्रपट महांमडळाचे रवींद्र बोरगावकर, सुभाष भुर्के, माजी अध्यक्ष विजय पाटकर यांच्यासह सभासद उपस्थित होते. महामंडळाच्या इतिहासात प्रथमच ९ पॅनेलमध्ये चुरशीची लढत होणार आहे. आजपासून सर्व पॅनेल व अपक्ष उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे.