कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या उत्तरेस असलेल्या तारदाळ-खोतवाडी रोडवरील कैलास टेक्स्टाईल कारखान्यास रात्री आग लागली.  शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कारखान्यातील ३५०० कापडाचे तागे जळून खाक झाले.तसेच यंत्रमागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचबरोबर इलेक्ट्रीक साहित्य, शेडवरील छत व फर्निचर यासह अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुमारे १ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखानदार कैलास कुम्हार यांनी दिली.

 तारदाळ-खोतवाडी रोडवर गेली २० वर्षे बाबासो महाजन यांच्या मळ्यानजीक कुम्हार यांचा यंत्रमागाचा कारखाना आहे. येथेच असणाऱ्या गोडावूनमध्ये ताग्यांचाही साठा मोठा होता. पहाटे शेडमधून प्रचंड धुराचे लोट दिसू लागले. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने जवळच असणाऱ्या मळे भागातील नागरिकांनी विझविण्याचा प्रयत्न केला. परंतू, आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने जयसिंगपूर व इचलकरंजी येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तब्बल तीन तासानंतर आग विझविण्यास यश आले. परंतू या आगीने कारखाना शेडमधील सर्वच साहित्य जळून खाक झाले होते.

Story img Loader