कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यातील पुराचे नियोजन २४ तासात बदलण्यात आले आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेवून त्या उद्या शुक्रवार पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. तर, शिवाजी विद्यापीठाने अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेवून उद्याच्या (२८ जुलै) सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय आज घेतला आहे.
अंदाजापेक्षा कमी पाऊस झाल्याने राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद करण्यात आला आहे. पंचगंगेची पाणीपातळी पाच ते सहा फूट वाढेल असा अंदाज प्रशासनाचा होता. पाऊस कमी झाल्यामुळे पाणी पातळी वाढली नाही. या बाबी लक्षात घेवून नियोजनाची दिशा आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बदलण्यात आली.
हेही वाचा >>> पश्चिम घाटात भूस्खलनाच्या प्रमाणात वाढ; शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील अभ्यासकांचे संशोधन
स्थलांतरीत घरी परतणार
शुक्रवार सकाळपर्यंत पावसाचा अंदाज घेवून निवारागृहातील नागरिकांना घरी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. धरण क्षेत्रातील पावसाचा जोर पाहून विसर्गाचे चांगल्या प्रकारे सनियंत्रण करण्याच्या सूचना केसरकर यांनी केल्या. यामुळे पुरामुळे स्थलांतरीत झालेल्या लोकांना घरपरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोकण वाहतूक पूर्ववत
बालिंगा येथील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याबाबत नागरिकांची मागणी व गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक तपासण्या करुन एकेरी आवश्यक बंदोबस्तासह एकेरी वाहतूक सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. कोकणाकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली आहे.
खासबाग मैदानाची दुरुस्ती ऐतिहासिक खासबाग मैदानाची तपासणी करुन जीर्ण व पडलेल्या भागाचे पुन्हा आहे त्या प्रकारे बांधकाम करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या.