गत ऊस गळीत हंगामामधील उसाची बिले वारणा साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे द्यावीत, त्यासाठी उर्वरित ३९५ रुपये तातडीने अदा करावेत. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारणा कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. येत्या दोनतीन दिवसांत एफ.आर.पी.प्रमाणे होणारी रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे यांनी करून, ही मागणी मान्य न झाल्यास दिवाळी सणादिवशीच वारणेत ‘खर्डा-भाकरी’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
या वेळी वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील व संचालक मंडळाने विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या वेळी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना रक्कम देण्याचा वारणा कारखान्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले.
गत गळीत हंगामातील एफआरपीची उर्वरित रक्कम आणि चालू गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम वारणा कारखान्याने तातडीने द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारणा कारखान्यावर मोटारसायकल रॅलीने मोर्चा काढला. वारणा शेतकरी कार्यालयासमोर आल्यानंतर विविध मागण्यांबाबत संघटना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या वेळी कारखाना प्रशासनाबरोबर कार्यकर्त्यांची किरकोळ बाचाबाची झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे म्हणाले, वारणा कारखान्याने वार्षति सभेत गत गळीत हंगामातील उर्वरित रक्कम व चालू गळीत हंगामातील रकमेबाबत सांगितल्यानुसार कोणतीही रक्कम शेतकर्याना अदा झालेली नाही. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना ‘वारणा’ने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना रक्कम अदा करावी, असे आवाहन केले.
या वेळी भीमशक्तीचे नेते व जिल्हा दक्षता समितीचे सदस्य वैभव कांबळे, स्वाभिमानी पक्षाचे हातकणंगले तालुकाध्यक्ष शिवाजीराव माने यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून ‘वारणा’ने दिवाळीपूर्वी रक्कम अदा करण्याची मागणी केली.
मोर्चात ‘स्वाभिमानी’चे जिल्हा संघटक विलासराव पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष किरण पाटील, संपतराव पोवार, डी. एम. भोसले, संघटनेचे कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2015 रोजी प्रकाशित
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वारणा कारखान्यावर मोर्चा
गत ऊस गळीत हंगामामधील उसाची बिले वारणा साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे द्यावीत
Written by अपर्णा देगावकर

First published on: 06-11-2015 at 03:10 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Front of shetkari swabhimani sanghatna on varna factory