कोल्हापुरात ‘जैवविविधतेचे संवर्धन’वर परिसंवाद
जगातील उपलब्ध जैवविविधतेतील मोठा हिस्सा हा भारतीय उपखंडामध्ये आढळतो. तथापि, यातील अनेक वनस्पतींची माहिती गोळा झालेली नाही, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे, असे मत गुलबर्गा येथील केंद्रीय विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जी. आर. नाईक यांनी येथे सोमवारी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र अधिविभागामार्फत ‘जैवविविधतेचे संवर्धन व त्याची शाश्वत उपयुक्तता’ या विषयावरील तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी डॉ. नाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद िशदे होते. या परिषदेमध्ये स्लोव्हाक रिपब्लिक, हाँगकाँग, श्रीलंका तसेच देशविदेशातील सुमारे ४०० संशोधक सहभागी झालेले आहेत. डॉ. नाईक म्हणाले, सध्याच्या काळामधील जैवविविधतेच्या अनन्यसाधारण महत्त्वामुळे वनस्पती वर्गीकरणशास्त्राची उपयुक्तता अधोरेखित झालेली आहे. या पाश्र्वभूमीवर वनस्पती वर्गीकरणशास्त्रातील संशोधकांची जबाबदारी निश्चितच मोठी आहे. भारतीय मूळ असणाऱ्या तीनशेपेक्षा जास्त वनस्पती या दैनंदिन आहाराची गरज भागवतात. हरितवायू उत्सर्जन व इंधनाचा वारेमाप वापर होत असल्यामुळे उपजावू जमिनींचे वाळवंटीकरण होत आहे. येऊ घातलेल्या जीएमओ पिकांमुळे होणाऱ्या फायद्यांबरोबरच जैवविविधतेला असणाऱ्या संभाव्य धोक्यांकडेही लक्ष द्यावे, असे मत व्यक्त केले. भारत सरकारच्या बी.एस.आय.चे संचालक डॉ. परमजित सिंग म्हणाले, या क्षेत्रामध्ये प्रचंड आवाहन असले तरी भविष्याच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रामध्ये कार्य करण्याची गरज आहे. सर्वसामान्य संशोधक व समाजातील सर्वसामान्य घटकांना या क्षेत्रातील योजनांविषयी माहिती होणे आवश्यक आहे. विविध संस्थांमध्ये जतन केलेल्या स्पेसिमेन्स हे संशोधकांना उपलब्ध होत नाहीत. मात्र, टॅक्सॉनॉमी (वनस्पतींचे वर्गीकरणशास्त्र) या दुर्लक्षिलेल्या विषयाला जिवंत ठेवण्याचे काम बॉटनिकल सव्र्हे ऑफ इंडिया यांनी केलेले आहे. बी.एस.आय.ने जतन केलेल्या माहितीचा उपयोग भारतातील सर्व नागरिकांना करता येतो.
स्लोव्हाक ऑफ सायन्सचे डॉ. कॅरोल मारहोल्ड आणि आयएएटीचे सचिव डॉ. साबू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड यांनी स्वागत केले. डॉ. एस. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. एस. ए. पाटील व स्वालेहा मुल्ला यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केले.