कोल्हापूर : येथील मध्यवर्ती गांधी मैदान साचल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गांधी मैदानाच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत गुरुवारी उद्धव ठाकरे शिवसेनिकांनी आंदोलन केले. या मैदानात पाणी तुंबवून जनतेत संभ्रम पसरवण्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिंदे सेनेने केली आहे.
मध्यवर्ती भागातील गांधी मैदानात पावसामुळे तीन फूट पाणी साचले होते. त्यामध्ये बदकांचाही वावर सुरू झाला होता. हा मुद्दा उपस्थित करीत या मैदानात बोटी फिरवण्याचा इरादा व्यक्त करीत ठाकरे सेनेने सोबत चेहरा विरहित आमदारांचा फलक आणला होता. पोलिसांनी हा फलक ताब्यात घेताना धावपळ उडाली. ठाकरे सेनेचे शहर रविकिरण इंगवले यांनी या कामाच्या माध्यमातून आमदार राजेश क्षीरसागर यांनी ५ कोटी रुपये लाटले आहेत, असा आरोप करून त्याचा पोलखोल करण्यासाठी आंदोलन केल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहर प्रमुख सुनील मोदी, आपचे प्रदेश सचिव संदीप देसाई यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.
शिंदेसेना आक्रमक
गांधी मैदानाच्या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी ४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला. मात्र, या परिसरातील मलनिःसारण वाहिनी जाणीवपूर्वक बंद केल्याने मैदानात पाणी साचले. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या टोळीप्रमुखास शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल, असा इशारा महानगर समन्वय कमलाकर जगदाळे, शहर प्रमुख रणजीत जाधव आदींनी दिला.