कोल्हापूर : पावसाची रिमझिम बरसात होत बुधवारी समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या मंगलमूर्तीचे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मंगलमय वातावरणात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे स्वागत केले जात होते.

गेले काही दिवस गणपतीच्या स्वागताची उत्साहाने तयारी सुरू होती. गणरायाच्या आगमनाची सकाळपासून घरोघरी लगबग सुरू होती. सकाळपासून घरगुती गणपतीबरोबरच, सार्वजनिक मंडळांच्या श्रींचे पावसाच्या हलक्या सरी झेलतच उत्साहात स्वागत करण्यात येत होते.

मूर्ती नेण्यासाठी कुंभार गल्ली, शाहूपुरी, बापट कॅम्प, पापाची तिकटी आदी भागात गर्दी झाली होती. लहान मुले, महिलांचा उत्साही सहभाग दिसून आला. पारंपरिक पद्धतीने श्रींची प्रतिष्ठापना घराघरातून करण्यात आली. काही घरगुती, सार्वजनिक मंडळांनी आधीच गणेशमूर्ती आणल्या होत्या. लाडक्या गणरायाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला. बाजारात पेढ्यांच्या चवीच्या मोदकाबरोबरच आंबा, गुलकंद, मलई, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, पायनापल असे विविध प्रकार उपलब्ध असून त्यांची मागणी वाढली आहे.

यंदा जनजागृती आणि पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘आवाजाच्या भिंती’(डॉल्बी यंत्रणा), तीव्र प्रकाशझोत (लेझर दिवे) यांचा मिरवणुकीतील वापर लक्षणीयरित्या कमी झालेला आढळला. तत्पूर्वी सकाळी मुहूर्तावर घरगुती गणेशाचेही उत्साहात आगमन झाले. दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सीसीटीव्ही आणि ‘ड्रोन’चीही मदत घेण्यात आलेली आहे.

जल्लोषी मिरवणुका

सार्वजनिक गणेश मंडळांनी दुपारनंतर वाजत गाजत गणपतीचे स्वागत केले. गणपती बाप्पाचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या निनाद अशा जल्लोषी वातावरणात निघालेल्या मिरवणुकीत भाविक, कार्यकर्त्यांचा उत्साह होता. पोलीस प्रशासनाने आवाजाच्या भिंतीवर निर्बंध घातल्याने त्याचा कर्णकर्कश आवाज काहीसा कमी झाला होता.

राजवाड्यात स्वागताचा सोहळा नवीन राजवाड्यात पारंपरिक पद्धतीने गणपतीचे आगमन पालखीतून झाले. श्रीमंत छ. शाहू महाराज, छत्रपती संभाजी राजे यांनी स्वागत केले. राजेशाही लवाजम्यासह, मानाच्या अश्वासह गणेश आगमनाचा सोहळा साजरा करण्यात आला.