कोल्हापूर : इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या सूत प्रदर्शनात देशातील आघाडीचे सूत उत्पादक, कापड उत्पादक, निर्यातदार, तंत्रज्ञान पुरवठादार आणि खरेदीदार यांना एकाच छताखाली एकत्रित आल्याचे दिसून आले. यानिमित्ताने नैसर्गिक आणि कृत्रिम सूत क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सूत उत्पादक प्रभावाचे दर्शन घडले.

इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (इस्फमा) यांच्यावतीने येथे यार्न एक्स्पो इचलकरंजी २०२५ चा शानदार शुभारंभ झाला. यावेळी लेंझिग फायबर्स इंडिया प्रा.लि.चे वरिष्ठ वाणिज्य संचालक अविनाश माने, ग्रासिम इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनमोहन सिंह, ट्रायडेंट यार्नचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय शुक्ला आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. देशातील नामवंत ४० उद्योगांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे.

इस्फमाचे अध्यक्ष अनिल गोयल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष धवल देसाई, रवी पंचोरीया, प्रमोद सोमाणी, महावीर जैन, विजय पारीख, सर्वेेश बांगड, ब्रिजेश मंत्री, निकुंज बांगडीया, सुनील बांगड, अतुल बावणे, बसंतकुमार मंत्री, मनीष पोरवाल, दीनदयाळ झंवर, किशोरकुमार मुंदडा, गोरखनाथ सावंत, संजय पाटणी, सचिन झंवर, सूत उत्पादक, उद्योजक उपस्थित होते.

पंचरत्न सांस्कृतिक भवनमध्ये ‘क्रॉस-लिक्ड टीएमसी फायबर्सचे प्रभावी वैशिष्टये सशक्त करणे, क्रेडिट विमा-खरेदीदार दिवाळखोरी विरूध्द तुमची ढाल या विषयावर मान्यवरांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. तर आज सौर व नवीकरणीय उर्जा-कापड निर्मात्यांसाठी आवश्यक,स्ट्रेच वोव्हन फॅब्रिक निर्मिती या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाचा इचलकरंजी परिसरातील उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोयल यांनी केले. 

पॉलिस्टर, व्हिस्कोस, नायलॉन आणि अ‍ॅक्रेलिक यार्नमध्ये मजबूत उत्पादन क्षमतांसह भारत सिंथेटिक आणि एमएमएफ कापडांसाठी जागतिक केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे. या प्रदर्शनात फंक्शनल यार्न, डोप-डायड फायबर, रिसायकल केलेले आणि पर्यावरणपूरक यार्न, उच्च-कार्यक्षमता असलेले तांत्रिक कापड आणि बरेच काही यासह विविध उत्पादने सादर केली  आहेत.  जी फॅशन, अ‍ॅक्टिव्हवेअर, ऑटोमोटिव्ह, होम टेक्सटाईल आणि हेल्थकेअर सारख्या उद्योगांना सेवा देतात.

इचलकरंजी २०२५ यार्न एक्स्पोमध्ये शाश्वतता आणि वर्तुळाकारपणावर भर दिला आहे. प्रदर्शक आणि तज्ञ पुनर्नवीनीकरण केलेल्या धाग्यांमधील नवकल्पना, शाश्वत उत्पादन पद्धती, पाणी आणि ऊर्जा कार्यक्षमता आणि भारताच्या हवामान कृती वचनबद्धता आणि जागतिक शाश्वतता उद्दिष्टांशी जुळणारे वर्तुळाकार कापड व्यवसाय मॉडेल सादर केले आहेत.