कोल्हापूर : इचलकरंजीत ज्येष्ठ अमावस्या निमित्त पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावात चौंडेश्वरी देवीचा वार्षिक उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंगळवार पेठेतील श्री चौंडेश्वरी मंदिर व गावभागातील श्री बनशंकरी मंदिर विद्युत रोषणाई व फुलांच्या आकर्षक सजावटीने नटले होते. दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

चौंडेश्वरी व बनशंकरी देवी कोष्टी समाजासह अनेक समाजांची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. दिवसभर भाविकांनी नैवेद्य दाखवून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. या उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे चौंडेश्वरी मुखवटा मिरवणूक. देवी दैत्याचा वध करते ही आख्यायिका सादर करणारा विधी याद्वारे सादर करण्यात आला. चौंडेश्वरी मंदिर व बनशंकरी मंदिरापर्यंत नेण्यात आलेल्या मिरवणुकीत समाज बांधव, महिला, युवक, आणि बालचमू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवांग समाजातर्फे सप्ताहभर भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मानाचा पालखी सोहळा चौंडेश्वरी मंदिरातून बनशंकरी मंदिरापर्यंत काढण्यात आला. देवीच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. तर हटकर कोष्टी समाज आणि श्री बनशंकरी ट्रस्टतर्फेही बनशंकरी मंदिरात विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले.