कोल्हापूर :  महादेवी तथा माधुरी हत्ती परत द्यावा या मोहिमेची दखल आता राज्य शासनाने घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मंगळवारी (५ऑगस्ट रोजी) एका बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी सायंकाळी पत्रकारांना दिली.

नांदणी येथील मठात गेली ३५ वर्षे असणार्‍या महादेवी हत्तीला पेटा या संस्थेच्या माध्यमातून गुजरात येथील वनतारा प्रकल्पात नेण्यात आले आहे. या विरोधात तीव्र जनभावना निर्माण झाली असून शिरोळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात महादेवी हत्ती परत आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने लढे सुरू झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत या संदर्भातील माहिती दिली होती.

त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार ५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे महादेवी उर्फ माधुरी हत्ती संदर्भातील विषयावर तातडीने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस सर्व लोकप्रतिनिधी, नांदणी मठाचे प्रमुख तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत महादेवी संदर्भात निश्‍चितपणे योग्य असा तोडगा निघेल, असा विश्‍वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला आहे.

दिवसभर मुक पदयात्रेला प्रतिसाद

 दरम्यान महादेवी हत्ती परत द्यावा या मागणीसाठी आज नांदनी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी काढलेल्या या पदयात्रेत हजारो नागरिक पहाटेपासून सहभागी झाले होते.

नांदणी पासून सुरू झालेली पदयात्रा कोल्हापूर – सांगली महामार्ग, पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेशली. ताराराणी पुतळा मार्गे ती जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर तेथे माधुरी परत करा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

पदयात्रेतील नागरिकांनी माधुरी परत करा, एक रविवार माधुरीसाठी, जिओ बहिष्कार असे लिहलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.

रिलायन्स मॉलवर बहिष्कार

  यावेळी राजू शेट्टी यांनी धार्मिक कार्यात महत्व असलेला, जिव्हाळ्याचा विषय असलेला महादेवी हत्ती परत करावी ही मागणी आहे. त्यासाठी जिओवर बहिष्कार हे पहिले पाऊल टाकले आहे. यापुढे रिलायन्स मॉलवर देखील बहिष्कार टाकू. वनतारा केंद्र हेच बेकायदेशीर आहे, असा आरोप केला. आमच्या मागण्याबाबत  राष्ट्रपतींच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चक्क सोन्याचा हत्ती

पदयात्रेमध्ये काही लोकांनी सोन्याचा हत्ती आणून माधुरी परत  करण्याच्या मागणीकडे अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.