कोल्हापूर : भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा पूर्वीपासूनच्याच घडामोडी, चर्चेचा भाग असून आता आम्ही या घेतलेल्या या निर्णयावर ठाम राहणार आहोत. आम्ही आता एक राजकीय भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणे हा आमचा नैतिक धर्म आणि कर्तव्य आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करून ही आम्ही घेतलेली भूमिका आम्ही सिद्ध करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे शनिवारी व्यक्त केले.
कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर पार पडले. त्यास उपस्थित राहिलेले मुश्रीफ आज कोल्हापुरात आले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाण्यासाठी आजच नाहीतर पूर्वीपासूनच घडामोडी, चर्चा घडत होत्या. त्यात नव्याने काही घडलेले नाही. प्रफुल्ल पटेल यांनी २००४ पासूनचा राजकीय घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला आहे. त्यावर अधिक भाष्य करायची गरज नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीसाठी गेली अनेक वर्ष चर्चा प्रयत्न सुरू होते हे दिसून आले आहे.
अजित पवार यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. या विषयी बोलताना मुश्रीफ म्हणाले, अजित पवार यांनी वस्तुस्थितीला धरून विधान केले आहे. अनिल देशमुख आमच्या सोबत होते पण नंतर त्यांनी सोबत येण्यास नकार दिला. त्यांनी इतके खोटे बोलू नये अशी टीकाही मुश्रीफ यांनी या वेळी देशमुख यांच्यावर केली.
‘अजितदादांना सल्ला देण्याचा कुणाला अधिकार नाही’
अजितदादांना सुपारी देण्याचा प्रश्न येत नाही. शरद पवार हे नकार का देत आहेत हे अजित पवार यांना कळालेले नाही; मग आम्हाला तरी कसे कळणार, असे मुश्रीफ यांनी नमूद केले. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना स्वतंत्र पक्ष काढावा असे म्हणत टीका केली होती. त्यावर मुश्रीफ म्हणाले, की ज्या पक्षांमध्ये वर्षांनुवर्षे काम केले आहे तो सोडून दुसरा पक्ष का काढायचा? या पक्षाच्या विस्तारासाठी अजित पवारांनीही मोठे कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांना अशा सल्ला देण्याचा कुणाला अधिकार नाही.