कोल्हापूर : धक्कादायक तितक्याच आश्चर्यकारक घडामोडी होत गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची शुक्रवारी निवड करण्यात आली. ते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र आहेत. या प्रक्रियेत सतेज पाटीलसमर्थक शशिकांत पाटील चुयेकर यांचे स्वप्न भंगले.
या घडामोडीनंतर गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली असल्याचा दावा केला जात आहे. यामागे राज्यातील सत्ताधारी वरिष्ठांकडून झालेल्या हालचाली निर्णायक ठरल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून गोकुळ दूध संघाकडे पाहिले जाते. या दूध संघात पाच वर्षांपूर्वी सतेज पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, विनय कोरे, चंद्रदीप नरके यांची सत्ता आली. प्रारंभी विश्वास पाटील हे दोन वर्षे, तर त्यानंतर अरुण डोंगळे हे दोन वर्षे अध्यक्ष होते. डोंगळे यांची मुदत संपल्यानंतर गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट करीत राजीनामा देण्यास नकार दिला. पण तो फार काळ टिकला नाही.
गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष होणार का याची चर्चा होत असताना काल महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत एक बैठक होऊन नावेद मुश्रीफ यांच्याकडे अध्यक्षपद आले पाहिजे यावर एकमत झाले.
गोकुळचे नेते सतेज पाटील यांना हा निर्णय मान्य करावा लागला. त्यानुसार सतेज पाटील यांनी अध्यक्ष निवडीचे पत्र विश्वास पाटील यांच्याकरवी गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पाठवले. निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध, पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नावेद मुश्रीफ यांच्या नावावर एकमत होऊन त्यांची अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली. विश्वास पाटील हे सूचक होते, तर अरुण डोंगळे हे अनुमोदक होते.
या निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना नावेद मुश्रीफ यांनी, गोकुळच्या अध्यक्षपदी मान्यवरांनी कामाची छाप उमटवली आहे. तोच वारसा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने अध्यक्ष म्हणून काम करताना सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कामकाज केले जाईल असे सांगतानाच त्यांनी गोकुळ दूध संघाचे वाहन न वापरता स्वतःचे वाहन वापरणार असल्याचे सांगितले.
नावेद यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण केली. साखरपेढे वाटण्यात आले. हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्याचा फेरा धरला. यानंतर नावेद मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहांमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली.