कोल्हापूर : शाळेतील मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाजीराव गणपती पाटील (रा. आमशी, ता. करवीर) या मुख्याध्यापकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. करवीर पोलिसांनी संबंधित शिक्षकास अटक केली असून याबाबतची फिर्याद पंचायत समिती करवीरचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी शंकर यादव यांनी दिलेली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, की बाजीराव पाटील हे करवीर तालुक्यातील वडणगे येथील कन्या विद्या मंदिरमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांनी शाळा सुरू झाल्यापासून दिनांक १७ जून ते २४ जुलै या दरम्यान शाळेमध्ये शिकणाऱ्या इयत्ता ६ व ७ विद्यार्थिनींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते संबंधित विद्यार्थिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असत.

याबाबत त्यांच्यावर तक्रारी येऊ  लागल्या. यामध्ये शाळेतील आठ मुलींच्या पालकांनी तक्रारी केल्या. त्यानुसार त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. ते या प्रकरणात दोषी असल्याचे आढळून आले, त्यावरून गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षक पाटील यास अटक केलेली आहे.

बदनामीची धमकी देऊन लैंगिक अत्याचार

डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा सिटी या उच्चभ्रू वस्तीतील एका महिलेवर याच भागातील एकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला आणि तिचा पती यांच्यातील भांडणाचा गैरफायदा घेत या व्यक्तीने हे कृत्य केले. पीडित महिलेने दोन महिन्यानंतर हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पीडित महिलेचे पती मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. पलावा सिटीतील क्लब हाऊसमध्ये पीडित महिला, तिचा पती, मुलगी बॅडमिंटन खेळण्यासाठी येत होते. त्यावेळी आरोपीचा पीडित महिला, तिचा पती यांच्याशी परिचय झाला होता.