करवीरनगरीच्या शारदीय नवरात्रोत्सवात रंग भरू लागला असून करवीरनिवासिनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लोटू लागली आहे. रविवारी उत्सवाच्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू असतानाही भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. दुसऱ्या दिवशी सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले होते. देवीची मयूरवाहिनी कौमारीमाता रूपात पूजा बांधण्यात आली होती.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवीची कौमारीमाता मयूरवाहिनी रूपात पूजा बांधण्यात आली. कुमारी पूजनात दोन वर्षांच्या कन्येला कौमारी अथवा कुमारीदेवी असे संबोधले जाते. या देवीची उपासना केल्याने आयुष्य व बल वृद्धी होते, अशी भाविकांची भावना आहे. रविवारची पूजा श्री पूजक नीलेश ठाणेकर, ऋषिकेश ठाणेकर, अमित दिवाण, श्रीनिवास जोशी यांनी बांधली आहे. सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. देवीची पूजा व आरती करण्यात आली.
रविवार हा सुट्टीचा वार असल्यामुळे पहाटे ३ वाजल्यापासून अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महिला व पुरुषांसाठी उभारण्यात आलेले दर्शन मंडप, तर पहाटेपासून फुल्ल भरलेले होते. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते सुनील बर्वे यांनी देवीचे दर्शन घेतले. सकाळपासून अंबाबाई मंदिरामध्ये मोठय़ा उत्साहाचे व चतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. महिला व पुरुषांची रांग तर अगदी भवानी मंडपापर्यंत पोहोचली होती. देवीची ओटी भरण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली होती. साधारण तासाला पाच हजार भाविक मंदिरातून दर्शन घेत होते. त्यामुळे दर्शनरांगेमध्ये जवळ जवळ चार ते पाच तास भाविक एकाजागी उभे होते.