कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर आणखी वाढला. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने तो दुपारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पावसाने पन्हाळ्यासह परिसराला झोडपून काढले. दरड कोसळल्याने करूळ घाट वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता.कोल्हापूर जिल्ह्यात आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. गेले पाच दिवस पाऊस कायम असल्याने नदीनाल्यात पाणी वाढू – वाहू लागले आहे.
ऐन उन्हाळ्यात पर्यायी मार्ग
कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दिवसभरात एक फूट पातळीवाढ झाली. दुपारी ४ वाजता राजाराम बंधारा पाणीपातळी १७ फूट झाली होती. त्यातून २५६४ क्युसेक विसर्ग होत होता. राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने त्याच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कठडे लावून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याची वेळ ऐन उन्हाळ्यात आली आहे.
पन्हाळ्यावर पावसाचे आक्रमण
सोसाट्याचा वारा, संपूर्ण शहरावर दाट धुके, कोसळणारा पाऊस यामुळे पन्हाळ्यावर ऐन उन्हाळ्यात आषाढ महिन्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यात सरासरी ३४.५ मिमी पावसाची नोंद होते. गेल्या सहा दिवसांत सरासरी १४५ मिमी म्हणजे नेहमी पडणाऱ्या पावसापेक्षा चाैपट पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. अतिवृष्टीने नेहरू उद्यान येथील दोन जुने वृक्ष व धर्मकोठीसमोरील एक वृक्ष उन्मळून पडल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.
दरड कोसळली
करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे कोल्हापूर-तळेरे मार्ग वाहतुकीसाठी तासभर बंद करण्यात आला होता. दगड, माती आणि झाडांचा मोठा ढीग रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीत व्यत्यय आला होता. भुईबावडा मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती.