कारागृहातील महिला कैद्यांकडून कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीच्या प्रसादाचे लाडू बनवून घेण्याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी घेतलेला निर्णय हा सर्वथा अयोग्य आहे. प्रसाद तयार करण्याचे काम हे एखादे व्यावसायिक कंत्राट न समजता देवीसाठी सात्त्विक प्रसाद बनवण्याची सेवा आहे. असा सेवाभाव मानणाऱ्या भक्तांकडे ही सेवा द्यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती करण्यात आली आहे. या मागणीला मासिक धर्माचे पालन हे कारण दर्शवित समितीने आपला अंतस्थ हेतूही प्रकट केला आहे.
देवाचा प्रसाद ग्रहण केल्याने ईश्वरी चैतन्य मिळते, असे धर्मशास्त्र सांगते आणि भाविकांचा तसा भाव असतो. धर्मशास्त्रानुसार कोणताही प्रसाद बनवतांना शुचिर्भूततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक असते. शुचिर्भूततेच्या नियमांमध्ये सकनादी कृत्ये, शाकाहार आणि मासिक धर्माचे पालन आदी गोष्टी अंतर्भूत असतात. कारागृहातील महिला कैद्यांकडून या नियमांचे पालन होईल, याचे दायित्व कोण घेणार ? तसेच कारागृहात कैद्यांमध्ये अन्य धर्मीय कैद्यांचा समावेशही असल्यामुळे त्यांचा देवतेप्रति भाव असेलच, असे गृहीत धरता येत नाही. कळंबा कारागृहात गांजासारखे अमली पदार्थ सापडतात, तसेच तेथील अनेक गैरकृत्ये वारंवार उघडकीस आली असून या कारागृहाची भयावहता त्यातून स्पष्ट होते. त्यामुळे श्री महालक्ष्मीसारख्या जागृत देवीचा पवित्र प्रसाद कैद्यांकडून करवून घेणे, हे आध्यात्मिक आणि आरोग्य अशा दोन्ही दृष्टीने अयोग्य ठरते. महालक्ष्मी देवीवर श्रद्धा असणारे आणि शुचिर्भूततेचे सर्व नियम पाळून प्रसाद बनवण्याची सेवा करण्यास इच्छुक असणारे अनेक महिला बचत गट कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत. त्यांचाही विचार मंदिर व्यवस्थापनाने करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu jankagruti samiti against making laddu from women prisoners of jail
First published on: 26-02-2016 at 03:15 IST