इचलकरंजी नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती राजू सिद्धू हणबर यांनी पदाचा राजीनामा नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्याकडे सुपूर्द केला. सात महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता असून, इम्रान बागवान आणि महेश बोहरा यांच्यात रस्सीखेच आहे. काँग्रेसचे सदस्य रमेश कांबळे यांना आपल्या गोटात सहभागी करून घेत तब्बल ५० वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या शिक्षण मंडळात राष्ट्रवादीच्या मदन कारंडे गटाच्या साहाय्याने सत्तांतर घडवत शहर विकास आघाडीने इतिहास घडवला. शिक्षण मंडळात काँग्रेसचे ६, शहर विकास आघाडीचे ३ आणि राष्ट्रवादीचा १ असे बलाबल होते. सात महिन्यांपूर्वी आघाडीच्या हणबर यांना ८, तर काँग्रेसच्या जाधव यांना ५ मते मिळाली. त्यामध्ये कांबळे व तालुका गटशिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी आघाडीच्या बाजूने मतदान केले होते. हणबर यांच्या निवडीने बागवान हे नाराज होते. त्यांची नाराजी दूर करताना पुढील संधी त्यांना देण्याचे ठरले, मात्र आघाडीचेच महेश बोहरा हेसुद्धा इच्छुक असल्याने वरिष्ठ कोणाची समजूत काढणार याकडे लक्ष लागले आहे.