कोल्हापूर : गरज असेल तेथे मदत करण्यात कोल्हापूरकर मागे राहत नाहीत. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. कोल्हापुरातील स्मशानभूमी दान स्वरूपात दोन लाखांहून अधिक रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. याठिकाणी महापालिकेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेटया ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविर्सजनासाठी येणारे नागरीक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात.

या गुप्तदान पेटया दरवर्षी मार्च अखेरीस उघडण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटी सोमवारी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. यानंतर नगदी विभागाकडील वरिष्ठ लिपीक राजेंद्र देवार्डेकर, सहा.आरोग्य निरीक्षक (स्मशान) महेश भोसले, विभागीय आरोग्य निरीक्षक ऋषीकेश सरनाईक, आरोग्य निरिक्षक सौरभ घावरी यांच्यामार्फत दानपेटीतील रक्कम मोजण्यात आली.

हेही वाचा : कोल्हापुरातील जरग नगरातील शाळेसाठी पालकांची सायंकाळपासूनच रीघ; महापालिकेच्या शाळा प्रवेशाचे अनोखे चित्र!

या दानपेटीमध्ये २ लाख ८ हजार ३९९ रुपये इतकी रक्कम जमा झालेली आहे.यापुर्वी माहे मार्च २०२३ मध्ये स्मशानभूमीकडील दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीकडे तब्बल ३,८६,२२४ इतकी रक्कम दान स्वरुपात दानपेटीत प्राप्त झालेली होती.

हेही वाचा : संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

दहन साहित्यालाही प्रतिसाद

स्मशानभूमीकरिता दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, नागरिक यांचेकडून शेणी, लाकूड दान करण्यास मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर दानपेटीतही प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे. याबद्दल सर्व दानशूर व्यक्तींची महानगरपालिका आभारी असल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.