कोल्हापूर: विमानतळाच्या संरक्षणाच्या कारणास्तव उजळाईवाडी – नेर्ली तामगाव रस्ता बंद करण्यात आला आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग होईपर्यंत तो बंद करू नये, अशी मागणी सोमवारी येथे करण्यात आली. या मागणीच्या निमित्ताने टोकाचे विरोधक असलेले काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील हे एकाच वाटेवर आल्याची बाब लक्षवेधी ठरली.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत १५ मे रोजी निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. या दिवशी तोडगा न निघाल्यास असहकार्याची भूमिका राहील, असा इशारा ऋतुराज पाटील यांनी दिला.

नेर्ली तामगाव मार्गाचा वापर उजळाईवाडी, कोल्हापूर परिसरातील नागरिक, हुपरी, पंचतारांकित एमआयडीसीकडे जाण्यासाठी करीत आहेत. हा मार्ग बंद केल्याने उद्योजक, नागरिक, कामगार, शेतकरी यांना दूरच्या अंतरावरून जावे लागणार आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करावा, तोपर्यंत रस्ता पूर्ववत चालू ठेवावा, अशी मागणी आज वरील तीन नेत्यांनी केली.

यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या दालनात बैठक झाली. पालकमंत्री आबिटकर यांनी १५ मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणारे मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सोबत चर्चा करून या मार्गावरून हलकी वाहने सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.