कोल्हापूर : शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पहाटे झालेल्या बैठकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी पक्की करण्यात आली आहे. या वृत्ताला खासदार धैर्यशील माने यांनी दुजोरा दिला आहे. तर, खासदार माने यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्याचे संदेश समाज माध्यमात अग्रेषित केले जात आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत येत होती. खासदार धैर्यशील माने हे मात्र उमेदवारी बाबत निश्चित होते. तथापि मधल्या काळामध्ये अनेक नावे चर्चेत आली होती. तर काहींनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. गेले दोन दिवस तर शौमिका महाडिक यांना उमेदवारी मिळणार असे वातावरण होते.

हेही वाचा : हातकणंगलेत शौमिका महाडिक यांच्यासाठी लढण्यास तयार – धनंजय महाडिक

तथापि महायुतीची उमेदवारी निश्चित करण्याबाबत काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्याला शिवसेना नेते एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : संकटकाळात शाहू छत्रपतींनी जिल्ह्याचे पालकत्व निभावले- आमदार ऋतुराज पाटील

शिवसेनेने मला उमेदवारी दिली याचा आनंद आहे. उमेदवारी मिळणार याचा सुरुवातीपासून विश्वास होता. आता त्यावर शिक्कामोर्तब होत आहे. उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांना धन्यवाद देतो. लवकरच निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ होईल, असे धैर्यशील माने यांनी लोकसत्ताला सांगितले.