कोल्हापूर : एमआयएमसारख्या पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी केले आहे. या विषयाचे भांडवल करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित असल्यानेच असे प्रकार विरोधक करीत आहेत. मात्र अशा प्रचारास कोल्हापूरची सुज्ञ जनता फसणार नाही, असे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार, सह प्रमुख विजय देवणे, आम आदमी पक्षाचे प्रदेश सचिव संदीप देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापुरात इंडिया, आघाडी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराज लोकसभा निवडणुकीस उभे आहेत. या निवडणुकीमध्ये शाहू छत्रपती यांचे नाव उमेदवारी पुढे आल्यानंतर व प्रत्यक्षात त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार लोकसभेमध्ये जाणार याची खात्री असल्यानेच प्रचंड प्रमाणात समाजातील विविध थरातील लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत आहे. यातून त्यांची निवडणुकीतील बाजू अधिकाधिक भक्कम होत चालली आहे.

हेही वाचा – कोल्हापुरात ‘एमआयएम’चा पाठिंबा घेण्यामागे कोणते षडयंत्र दडले आहे; हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सवाल

हेही वाचा – वारसा नको तर विकासावर बोलूया; संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांना थेट खुल्या चर्चेचे निमंत्रण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निवडणुकीत अनेक पक्ष, संघटना यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. परंतु कोल्हापूरसाठी भूमिका घेताना मात्र आपापल्या पक्षाची देशातील, राज्यातील भूमिका बाजूला ठेवून शाहू छत्रपती यांना बिन शर्थ पाठिंबा देत आहेत. या पार्श्वभूमीवर २१ एप्रिल रोजी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा ते पत्रकार परिषद म्हणाले होते की, कोल्हापुरातील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शाहू छत्रपती यांना समर्थन देण्यास सांगितले आहे. शाहू छत्रपती यांनी मला फोन केला नाही. त्यांनी माझ्याकडे समर्थन मागितलेले नाही. परंतु सर्वच राजकीय पक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित राजकारण करतात. राजर्षी शाहूंचे समाजाचे स्थान माहित असल्याने मी पक्षनेते ओवेसी यांना शाहू छत्रपतींसारख्या चांगल्या उमेदवाराला मदतीची भूमिका असली पाहिजे, असे सांगितले त्यातून आम्ही स्वतःहून त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की आम्ही एमआयएमकडे पाठिंबा मागितला नव्हता. त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्न येत नाही, असे या पत्रकात म्हटलेले आहे.