कोल्हापूर : सांगलीतील नाराजीचा परिणाम हातकणंगलेत जाणवणार नाही. येथे महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे प्रचारात सक्रिय झाले आहेत, असा निर्वाळा ठाकरेसेना, काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी दिला. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना देण्याचा निर्णय अंतिम झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट पसरलेली आहे.

विशाल पाटील हे बंडखोरी करण्याची चिन्हे असल्याने त्याचा परिणाम शेजारच्या हातकणंगले मतदारसंघात कसा उमटणार याकडे लक्ष होते. तथापि ठाकरे सेनेचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर व काँग्रेसचे आमदार राजू आवळे यांनी मविआचे नेते एकत्रितपणे प्रचारात सक्रिय झाले असून सांगलीतील नाराजीचा परिणाम येथे जाणवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : मंडलिक – महाडिक एकी हीच सतेज पाटील यांची भीती – चंद्रकांत पाटील

एकी अभेद्य

याबाबत हातकणंगलेचे आमदार आवळे म्हणाले, शिवसेनेने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे सोपवला आहे तर सांगलीची जागा काँग्रेसने शिवसेनेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीच्या निवडणुकीच्या राजकारणात जागांची अदलाबदल होत असते. यातून किरकोळ नाराजी असली तरी त्याचा हातकणगलेत याचा परिणाम जाणवणार नाही. केंद्रातील भाजपचे सरकार घालवण्यासाठी या मतदारसंघात मविआचेचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करीत आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, मविआ अंतर्गत नेत्यांची चर्चा होऊन राज्यभरातील जागा वाटपाचा निर्णय झाला आहे. सांगलीतील निर्णयाचा हातकणंगलेत पडसाद उमटणार नाहीत. येथे उभय काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरले असल्याने मविआसाठी वातावरण अत्यंत पूरक आहे.