शिवसेना आमदारांना भाजपचे वेध?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस किंवा डाव्या चळवळीचे केंद्रबिंदू राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ात शिवसेनेने गेल्या निवडणुकीत चांगलीच छाप पाडली. दहापैकी सहा आमदार शिवसेनेचे निवडून आले, पण शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले. या गटबाजीतून मंगळवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला झाला. वरिष्ठांच्या कानावर या साऱ्या बाबी जाऊनही नेतृत्व काहीच दखल घेत नाही ही शिवसैनिकांची व्यथा आहे.

पक्षहितापेक्षा स्व-अस्तित्व जपण्यासाठी लाथाळ्या सुरू असल्याचे मंगळवारच्या ताज्या प्रकाराने पुन्हा एकवार स्पष्ट केले . या गटबाजीला शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ आहे, अशी कुजबूज ऐकू येते.  वाढत्या गटबाजीमुळे शिवसेनेची राजकीय प्रगती होण्यापेक्षा अधोगती होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. आगामी निवडणुकात सेनेला राजकीय फटका बसण्याबरोबरच काही आमदार ऐनवेळी पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजप मध्ये प्रवेश करण्याचे संकेतही मिळत आहेत. शिवसेनेच्या तीन आमदारांची भाजपमधील तिकीटे पक्की झाल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जाते. आता हे वास्तव्य आहे की, भाजपच्या कुजबूज आघाडीकडून सोडण्यात आलेली पुडी हे कालांतराने स्पष्ट होईल. पण त्यातून शिवसेनेत मात्र संशयाचे वातावरण तयार झाले आहे.

कोल्हापूर  शहरप्रमुख दुग्रेश लिग्रस यांच्या राजारामपुरीतील कार्यालयावरझालेल्या हल्याने शिवसेनेतील गटबाजी उघड झाली आहे. आमदार राजेश क्षीरसागर  यांच्या इशारयाने हल्ला झाल्याचा आरोपच लिंग्रस यांनी केला आहे.  हा आरोप क्षीरसागर समर्थकांनी खोडून काढला असून, उलट लिंग्रस यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. खरे तर क्षीरसागर व लिग्रस हे कालपर्यंत  गळ्यात गळे  घालून फिरायचे पण आता ते एकमेकांच्या विरोधात गेले आहेत.

गटबाजीची जुनी जखम

कोल्हापुरातील राजकारणाला मातोश्री’ वरूनही खूपच महत्त्व दिले जाते . शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे हे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापुरातूनच नव्या कार्याचा, मोहिमेचा आरंभ करीत असत.  शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर उध्दव ठाकरे यांनी पहिला दौरा कोल्हापुरातच केला तेव्हा त्यांनी  शिवसनिकांना आधार देतांना ‘रडायचं नाही, लढायचं’ असा संदेश दिला होता. पण शिवसनिकच आपापसात लढत आहे. शिवसेनेतील यादवी तशी जुनी.  शिवसेनाप्रमुखांनी १६ मे १९८६ रोजी कोल्हापुरात शिवसेनेची स्थापना केली. तेव्हापासूनच अंतर्गत संघर्षांची बीजे रोवली. दोनदा आमदार झालेले सुरेश साळोखे व जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांच्यातील वाद एकमेकांवर गोळ्या झाडण्यापर्यंत गेला होता. तर चव्हाण यांनी तत्कालीन जिल्हाप्रमुख विनायक साळोखे यांच्यावर पक्ष कार्यालयातच हल्लाबोल केला होता. चव्हाण – रामभाऊ फाळके यांच्यातही संघर्ष घडला.

यादवीचे वाढते लोण

आता पूर्वसुरींनी यादवीचे धडे दिले म्हटल्यावर आताची पिढी गप्प कशी बसले , उलट आणखी जोमाने गटबाजीचा झेंडा उंचावताना दिसत आहे . त्यातून शिवसेनेतील कामापेक्षा अंतर्गत खदखद अधिक ठळकपणे समोर येत राहते . अलीकडे राजेश क्षीरसागर  आणि त्यांचे  विरोधक संजय पवार  यांचात विस्तव जात नाही . जिल्हा प्रमुख  विजय देवणे यांचा वावरही पवार यांच्यासोबत . तर आमदारासमावेत दहा वष्रे सोबत करणारे लिग्रस हे हली  पवार यांचा सोबत अधिक असतात .

नेत्यांच्या समर्थनाने दुफळी 

गाव तेथे शिवसेना अशी हाकाटी पिटत पक्षबांधणी भक्कम करण्याचा विचार व्यासपीठावरून नेते जाहीर करीत असतात. दुसरीकडे, गटबाजीला उत्तेजन देतांना गावोगावच्या शिवसनिकांचे पद्धतशीर खच्चीकरणही केले जात असते . संपर्कप्रमुख दिवाकर रावते व नेते अरुण दुधवाडकर हे क्षीरसागर यांना पाठीशी घालत आपल्याला अवमानास्पद वागणूक देतात, असे सांगत संजय पवार यांनी या दोघा नेत्यांना कडवे आव्हानच दिले. त्यातून तोंड गोड करण्याच्या संक्रांतीच्या सणादिवशी शिवसेनेत शिमगा झाला होता . नेत्यांच्या समर्थनाने दुफळी माजली जात असल्याने शिवसनिकांत खदखद सुरू आहे.  सामान्य कार्यकर्त्यांपासून ते जिल्ह्य़ातील प्रमुख पदाधिकारयांचा उघडपणे पाणउताराही त्यांच्याकडून होत असतो. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या इचलकरंजीतील कांही पदाधिकाऱ्यांनी  नेतृत्वाशी दोन हात केले होते.

आगामी निवडणुकांत फटका ?

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पक्षाचे संपर्क नेते अरुण दुधवडकर यांनी काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता पण हा निर्णय चंद्रदीप नरके , सत्यजित पाटील , डॉ . सुजित मिणचेकर या आमदारांनी धुडकावून  लावला . त्यांनी आपले सात सदस्य भाजपच्या छावणीत नेवून सोडल्याने जिल्हा परिषदेत प्रथमच ‘कमळ ‘ फुलले . तिन्ही आमदारांच्या  या निर्णयामुळे शिवसेनेतील गटबाजीने  उचल खाल्ली आहे. संजय पवार , विजय देवणे , मुरलीधर जाधव या तिन्ही जिल्हाप्रमुखांनी ‘मातोश्री’ कडे खलिता पाठवत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तीनही  आमदारांवर  कारवाई करण्याची मागणी केली होती . यामुळे सेनेचे काही आमदार नाराज आहेत. याला करणे दोन. एक तर कोल्हापूरला मंत्रिपद देण्याचा निर्णय मातोश्री वरून अजूनही होत नाही. दुसरे जिल्ह्य़ात भाजपची राजकीय प्रगती पाहता विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवावी , असे काही आमदारांच्या मनात आहे. या साऱ्या गोंधळात मात्र जिल्ह्य़ात शिवसेनेचे नुकसान होत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internal dispute in shiv sena at kolhapur
First published on: 24-08-2017 at 01:30 IST