कोल्हापूर : नांदणी मठातील महादेवी हत्तिणीचा मुद्दा आता धार्मिक आणि भावनिक पातळीवरून राजकारणाचा केंद्रबिंदू बनू लागला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण ढवळू लागले आहे. अस्मितेचा मुद्दा ठरलेली हत्तीण परत मिळावी यासाठी पदयात्रा, मोर्चे, स्वाक्षरी मोहीम, आत्मक्लेश रूपाने राजकीय आंदोलने सुरू झाली आहेत. या आंदोलनांचा केंद्रबिंदू कोल्हापूर असले तरी त्याचे लोण आता सांगली, सातारा, सोलापूरसह कनार्टक राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांतही पसरू लागले आहे. या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर सत्ताधारी बचावात्मक भूमिकेत गेल्याचे दिसत आहेत.

नांदणी येथील जैन मठातील हत्तिण वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आली असून तिची मालकी असलेल्या अंबानी उद्याोगसमूहाविरुद्ध संताप व्यक्त होऊ लागाला आहे. या असंतोषातूनच आता विविध पद्धतीने निषेध आंदोलने सुरू झाली असून त्यात सर्वच राजकीय पक्ष उतरल्यामुळे नांदणीच्या हत्तीचा हा विषय आता राजकीय पटलावर आला आहे. दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हत्ती परत आणण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे घोषित केले आहे. त्यावरून माजी पालकमंत्री, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी हत्ती परत कधी येणार हे जाहीर करा, असे म्हणत सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले आहे.

दरम्यान, याच प्रश्नावरून रविवारी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय मूक पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपआपल्या कार्यकर्त्यांसमवेत हजेरी लावली. या पदयात्रेतून राजू शेट्टी यांनी उद्याोजक अंबानी आणि सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. त्यातूनच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ माजी मंत्री प्रकाश आवाडे, एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपचे आमदार राहुल आवाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार अशोक माने या सत्ताधाऱ्यांना बोलू न देता पिटाळून लावण्याचा प्रकार घडल्याने या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेले राजकारण आमने-सामने येण्यापर्यंत पोहोचले.

मुख्यमंत्र्यांकडे आज बैठकीचे आयोजन

मुंबईतील कबुतरखाने बंद करणे तसेच कोल्हापूरमधील महादेवी हत्तिणीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. यासंदर्भात विचारता फडणवीस म्हणाले, जनभावना लक्षात घेऊन सरकारला काय करता येईल, याचा विचार करण्यासाठी कबुतरखाना आणि महादेवी हत्तीण या दोन्ही बाबींसंदर्भात बैठक बोलाविण्यात आली आहे.

उद्याोगपतीच्या हितासाठी भाजप हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देत आहे. मंदिर परंपरा मोडीत काढणारे भाजपचे हिंदुत्व खोटारडे आहे. आगामी निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केले पाहिजे. – राजू शेट्टी, माजी खासदार

‘महादेवी’ हत्ती परत आणण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सर्वपक्षीय व्यापक बैठक बोलावली आहे. भाजप- अंबानी यांचा परस्पर काहीच संबंध नसताना तशा पद्धतीची मांडणी चुकीची, एकांगी आहे. – राहुल आवाडे, आमदार