कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मतचोरीच्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ३०० खासदार रस्त्यावर आले हे नाकारता येत नाही. लोक याबाबत बोलतात याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. लोकांची शंका तयार होईल असे काम निवडणूक आयोगाने केले तर लोक हे किती दिवस सहन करतील हे सांगता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. मात्र हे स्पष्ट करतानाच निवडणूक गैरप्रकाराबाबत माझ्याकडे पुरावा नाही, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, आमच्या पक्षाला लोकसभेला राज्यातील ४८ पैकी १० जागा मिळाल्या. पण तेच विधानसभेला आम्ही ११० जागा लढवूनही आम्हाला केवळ १० जागा मिळाल्या. आमचा एक उमेदवार गेली २५ वर्षे निवडून येतो. पण त्याचा पराभव झाला. या सगळ्यांमुळे शंका निर्माण होते, पण याबाबत माझ्याकडे पुरावा नाही.

मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना पवार म्हणाले, हैद्राबाद गॅजेट हे एक दिशा दाखवत आहे. मला याची प्रत मिळाली आहे. सामंजस्य रहावे, एकीची वीण कायम रहावी असे सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, छगन भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावे यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे, हे घातक आहे. विखेंच्या समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत. मात्र बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत. अशाने सामाजिक कटुता कशी कमी होईल, असा प्रश्न उपस्थित करून पवार म्हणाले, की राज्याच्या हितासाठी असलेल्या मार्गाने जावे लागेल. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कटुता इतकी निर्माण झाली आहे की एकमेकांच्या व्यवसायाकडे लोक जात नाहीत. हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हते.

मोदींना शुभेच्छा

अमृत महोत्सवी वाढदिवस हा त्यांच्या सहकाऱ्यांसाठी महत्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ७५ वा वाढदिवस साजरा करताना मी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या, असे नमूद करून पवार म्हणाले की, कोणतंही राजकारण न आणता सुसंकृत राजकारण दाखवले पाहिजे. देशाबाहेरील नेतृत्वानी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्यांना कोणी अवतार पुरुष का म्हटले हे मला समजले नाही. ७५ व्या वर्षी मी थांबलो नाही. त्यामुळे त्यांनी थांबावे असं मला म्हणता येणार नाही.

गडकरींचे निर्णय हिताचे

वीज, इथेनॉल, साखर असे वेगवेगळे उत्पादन घेतले तर साखरेचा व्यवसाय परवडणारा आहे अन्यथा नाही. त्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे. नितीन गडकरी यांचा दृष्टीकोन चांगला आहे. इथेनॉल बाबत ते जे निर्णय घेतात ते शेतकऱ्यांसाठी हिताचे आहेत, असा निर्वाळा पवार यांनी यावेळी दिला.