जय महाराष्ट्रवर संभाव्य बंदीच्या विरोधात हजारोंचा मोर्चा

कानडी दडपशाहीला भीक न घालता बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषकांनी ‘जय महाराष्ट्र’ या शब्दप्रयोगावरील संभाव्य बंदीच्या निषेधार्थ गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात उत्स्फूर्तपणे हजारो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये वरील मागणीसह कर्नाटक शासनाची परिपत्रके मराठी भाषेतून मिळावीत, शेत जमिनीचे भूसंपादन, जाचक कर रद्द करावेत आदी मागण्या करण्यात आल्या.

मध्यवर्ती समितीच्या या मोर्चाची सुरुवात ११ वाजता झाली. या मोर्चासाठी सकाळपासूनच शेकडोंच्या संख्येने मराठी भाषक गटागटाने सामील होत होते. यामध्ये तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व गटातील नागरिक होते. या मोर्चावेळी संभाव्य बंदी असलेल्या ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर जिल्हाधिकारी एन. जयराम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दरम्यान मोर्चात ‘जय महाराष्ट्र’च्या  घोषणा दिल्याने पित्त खवळलेल्या कर्नाटक पोलिसांनी लगेचच दडपशाहीला सुरुवात केली. या घोषणा दिल्याबद्दल पोलिसांनी लगोलग आमदार संभाजी पाटील, आमदार अरिवद पाटील यांच्यासह मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर आदींवर गुन्हे दाखल केले आहेत.

जय महाराष्ट्रजन्मसिद्ध अधिकार

‘जय महाराष्ट्र’ ही घोषणा देणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे . ते म्हणायला आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. ही घोषणा देऊन आम्ही कर्नाटकाचा अपमान करत नाही. तरीही ही घोषणा दिली म्हणून कर्नाटक शासनाने घटनाबाह्य़ पद्धतीने माझी आमदारकी रद्द करावी.  आमदार संभाजी पाटील      

सर्वत्र जय महाराष्ट्र’!

आजचा मोर्चा बेळगावकरांची अस्मिता चेतावणारा ठरला. मोर्चात सहभागी मराठी भाषकांनी हातात ‘जय महाराष्ट्र’ शब्द लिहिलेले फलक घेतले होते. सर्वत्र ‘जय महाराष्ट्र’ हीच घोषणा दिली जात होती. तरुणांनी हातावर ‘जय महाराष्ट्र’ शब्द  गोंदवून घेतले होते. मोर्चात सहभागी सर्व दुचाकींवर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिले होते.