कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश जनता दलाचे माजी अध्यक्ष, जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माजी आमदार एडवोकेट श्रीपतराव शिंदे यांचे आज सायंकाळी पुणे येथे निधन झाले. गेले काही दिवस ते रुबी हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. समाजवादी चळवळीतील मोठा आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निर्णयाचे वृत्त समजतात गडहिंग्लज परिसरात शोककळा पसरली.

कसबा नूल या गडहिंग्लज तालुक्यातील गावातून शिंदे यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सामाजिक, सहकार, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ काम केले. आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज साखर कारखान्याचे ते अध्यक्ष होते. गडहिंग्लज नगरपालिका त्यांनी अनेक वर्ष जनता दलाच्या ताब्यात ठेवली. पाच वर्षांपूर्वी त्यांची मुलगी स्वाती कोरी या तेथे नगराध्यक्ष होत्या. महाराष्ट्र सीमा प्रश्न लढ्यात ते अग्रभागी होते. राष्ट्र सेवा दलात त्यांची जडणघडण झाली. समाजवादी विचाराधारेचा त्यांच्यावर अखेरपर्यंत प्रभाव राहिला. सुरुवातीच्या काळात त्यांनी माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर गडहिंग्लज येथील न्यायालयात वकिली केली.

हेही वाचा >>> श्रेयासाठी आमदार गाडगीळ यांचा खोटारडेपणा; पृथ्वीराज पाटील यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 देवदासी प्रथा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, विषमता निर्मूलन, पूरग्रस्त, धरणग्रस्त, अंगणवाडी सेविका, एस.टी., नगरपालिका व साखर कामगार, शेतकरी-शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आणिबाणीच्या काळात दीड वर्षाचा तुरूंगवासही त्यांनी भोगला होता. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिलादेवी, कन्या डॉ. रचना संजय थोरात (कराड), प्रा. स्वाती महेश कोरी (माजी नगराध्यक्षा,  गडहिंग्लज), चार भाऊ, बहिण बहीण वसुधा पवार,जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. ‘सायबर’चे संस्थापक दिवंगत डॉ. ए. डी. शिंदे, दिवंगत माजी उपायुक्त वसंतराव शिंदे, पशुसंवर्धन कर्मचारी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष डॉ. विजयराव शिंदे यांचे ते बंधू तर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचे ते मेव्हुणे होत.