कोल्हापूर : राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड करण्यास विलंब लावला जात आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून विरोध धारधार होण्याची भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

ते म्हणाले, हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवड करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. पावसाळी अधिवेशन सुरू झाले तरी अद्याप ही निवड केलेली नाही. शासन लोकशाहीची बूज ठेवत नाही. विरोधी पक्षनेता नियुक्त केला तर सभागृहात त्यांना मांडणी करण्यासाठी वेळ देणे बंधनकारक राहणार आहे. त्यातून शासनाचे दोष पुढे येण्याची भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याने ते ही निवड लांबणीवर टाकत आहेत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी स्वबळावर लढण्यात येईल असे सांगितले गेले. याकडे लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, स्थानिक पातळीवर ताकद असेल तर स्वबळावर लढावे. प्रत्येक जिल्ह्याला तसे अधिकार राष्ट्रवादीने दिले आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या तर चांगले यश मिळू शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऊस उत्पादनासाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यातून अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याबद्दल बोलताना पाटील म्हणाले, गेल्या हंगामात उसाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे साखरनिर्मिती कमी झाली. एआय तंत्राचा वापर झाल्याने ऊस उत्पादनात चांगली वाढ होणार आहे. पण त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. जादा उसापासून इथेनॉल निर्मितीसारखे पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय या तंत्राचा वापर उसाबरोबर अन्य पिकांच्या वाढीसाठीही होणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.