कोल्हापूर : राज्य एसटी कर्मचारी सहकारी बँकेमध्ये ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा मार्गदर्शक म्हणून आम्ही स्वीकार केला होता. पण ते आता सर्वांचे मालक व्हायला निघाले असल्याने त्याला आमच्यासह एसटी जनसंघाने विरोध दर्शवला आहे. १९ पैकी १४ संचालक सदावर्ते विरोधात उभे ठाकले आहेत. त्यांना सदावर्तेकडून धमक्या आणि आलिशान मोटारींची आमिषे दाखवली जात आहेत, अशी माहिती बंडखोर संचालकांचे प्रवक्ते, एसटी कष्टकरी जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली.
ते म्हणाले, सदावर्ते यांनी पैसे घेऊन आणि बेकायदेशीररित्या नोकर भरती केली. त्यांचे मेहुणे सौरभ पाटील यांना बँकिंग क्षेत्रात कोणतेही ज्ञान नसताना त्यांची नियुक्ती उच्च अधिकारी पदी करून नवा वाद निर्माण केला होता. ३८ कर्मचाऱ्यांची त्यांनी चुकीच्या पद्धतीने निवड केली आहे. गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील, आणि त्यांचे मेहुणे सौरभ पाटील यांच्या वादग्रस्त कारभारावर बोट ठेवत त्यांची लवकरच हकालपट्टी करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा : राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामाने कोल्हापूरातील नेत्यांमध्ये वादाच्या भिंती
सदावर्ते बँकेत कोणत्याही पदावर नाहीत. त्यांची पत्नी जयश्री पाटील या एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष आहेत. जनसंघाचे नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेल्या पॅनलची सत्ता बँकेत आली म्हणून सदावर्ते बँकेच्या कारभारात हस्तक्षेप करीत आहेत . त्यांच्या लुडबुडीमुळे आणि जातीय द्वेषजनक वक्तव्यामुळे ठेवीदारांनी ४८० कोटीच्या ठेवी काढून घेतल्याने बँकेचा सीडी रेशो बिघडला आहे. बँक अडचणीत आल्याने बहुतांशी संचालकांनी त्यांचे नेतृत्व झुगारले आहे. बँकेची स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांनी बंड केले आहे,असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा : केंद्र सरकारचा इथेनॉल बंदीचा निर्णय तुघलकी; राजू शेट्टी
हे संचालक सोबत
सध्या गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात १४ संचालक असून ते लवकरच होणाऱ्या बैठकीत विरोध उघडपणे दाखवून देतील. त्यातील ११ संचालक एका हॉटेलमध्ये आहेत. एकजण त्यांच्या कामामुळे घरी आहेत तर दोघेजण त्यांच्या सोबत असले तरी बैठकीवेळी ते आमच्यासोबत येतील, असा दावा शिंदे यांनी केला.