दयानंद लिपारे
कोल्हापूर : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण आणि कोल्हापुरातील प्रवेशद्वार असणारा बास्केट ब्रिज ही दोन्ही कामे पंचगंगा नदी पुलाववरून केली जाणार आहेत. या बांधकामाची रचना ही पुराच्या तीव्रतेत वाढ करणारी असल्याचा वादग्रस्त मुद्दा चर्चेत आला आहे. यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये वादाच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. कोल्हापुरातील हा वाद नागपूरस्थित केंद्रीय मंत्र्यांच्या दरबारात पोहोचला आहे.
पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सध्या चार पदरी आहे. तो सहापदरी करण्याचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुरू आहे. याच वेळी कोल्हापूर मध्ये प्रवेश करताना गांधीनगर येथे वाहनांना अडथळ्याची कसरत करावी लागत असल्याने खासदार धनंजय महाडिक हे गेली काही वर्ष कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बनणाऱ्या बास्केट ब्रिज साठी प्रयत्नशील आहेत. केंद्र सरकारने १७० कोटी रुपयांच्या या कामाला मंजुरी दिली आहे. मात्र, ही दोन्ही कामे एकमेकांशी निगडित असून ती कोल्हापूरच्या पूर्वेकडे असलेल्या पंचगंगा नदीच्या पुलावर बांधली जाणार आहेत. या कामांची बांधकाम रचना ही महापुराला निमंत्रण देणार असल्याचा वादग्रस्त मुद्दा पुढे आला आहे.
हेही वाचा… आक्रमक भाजपला उत्तर देण्याची शिंदे सेनेची रणनिती
करवीर,हातकणंगले तालुक्यातील सरपंचांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. या वादावर मार्ग काढण्यासाठी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील, राजू आवळे, जयंत आसगावकर हे काँग्रेसचे तीन आमदार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्यासमवेत बैठक घेतली. सरपंच, उपसरपंचांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पुलाचे काम नेमके कसे होणार आहे याची माहिती देत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. या बैठकीत पंचगंगा नदीवर पूल उभारताना बॉक्स पुलची रचना गृहीत धरली असल्याने महापुराची तीव्रता कायम राहणार आहे. त्याऐवजी पिलरचा पुल उभा केल्यास पूर व्यवस्थापन सुकर होणार आहे. या बदलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जिल्ह्यातील खासदार,आमदारांनी भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, निर्णयच रोख कोठे जाणार याची चाहूल लागल्याने हि भूमिका कोणत्याही राजकीय रंगाचा नाही हे सांगायला सतेज पाटील विसरले नाहीत.
अलीकडेच, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट इंजिनिअर कोल्हापूर यांनी राष्ट्रीय महामार्गावरील व लाल रेषेमधील शिरोली पुलाचे बास्केट ब्रिज व त्याचे पोहोच रस्ते याचे बांधकाम हे पिलर पद्धतीने व्हावे अशी मागणी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. महापुराची तीव्रता विचारात घेऊन पुलाचे हायड्रोलिक डिझाईन सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर पुणे यांच्याकडून तपासून घेण्यात यावे, अशी मागणी अध्यक्ष अजय कोराणे यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे केली.
हेही वाचा… धनंजय-पंकजा मुंडे एकत्र येतील, पण कसे ?
महाडिकांचा संवाद पूल
या कामाला वादाचे वळण मिळते आहे असे म्हटल्यावर खासदार धनंजय महाडिक यांना खुलासा करण्यासाठी पुढे येणे भाग पडले. बास्केट ब्रिज साकारताना चार बाय सहा मीटर लांबी रुंदीचे १३ मोरी सुदृश्य पॅसेज तयार होतील. त्यापैकी दोन पॅसेज मधून वाहतूक करता येणार आहे. त्याने महापुराचे पाणी वाहून जाईल. तरीही सध्या बनवलेल्या पुलाच्या किंवा महामार्गाच्या रचनेत आणखी काही सुधारणा आवश्यक असेल तर त्याचा विचार करू. संसदेच्या अधिवेशनात कोल्हापूरचे तिन्ही खासदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतील, असे स्पष्ट करीत महाडिक यांनी वादाचा पूल थोपवण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रश्नावरून वादाच्या भिंती तयार होत आहेत हे लक्षात घेऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधला. गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी श्रीवास्तव आणि संतोष यादव यांच्याशी दूरध्वनीवरील संपर्क साधून नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय महत्वाचा निर्णय घेतलाच कसा अशी विचारानं करून तीव्र नाराजी व्यक्त केली. या चर्चेअंती पुलाचा आराखडा बदलला जाणार आहे, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. पाठोपाठ पुलाच्या नव्या रचनेची उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा… खासदार शिंदे गटाचा, तयारी भाजपाची; पालघर लोकसभेत भाजपाची कुरघोडी?
वारणाकाठ तापला
पंचगंगा नदीवरील पुलाचा वाद निर्माण होत असताना उत्तरेकडील वारणा नदीचे पूल ते घुणकी फाटा या रस्त्यावर भराव टाकून पिलर पद्धतीने उड्डाणपूल करणे सोयीचे आहे,अशी मागणी शेतकऱ्यांनी २००५, २००१९, २०२१ च्या महापूराच्या आधारे मागणी चालवली आहे. यासाठी त्यांनी आमदार विनय कोरे, खासदार धैर्यशील माने यांनी पुढाकार घेण्याची मागणी केली असल्याने या लोकप्रतिनिधींना यामध्ये लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कागल हा विधानसभा मतदारसंघ. कागल या शहरा जवळून राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. ते करताना महापुराचा धोका होऊ नये यासाठी भरावाचे पूल बांधला जाऊ नये, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे महामार्ग अधिकाऱ्यांची बैठकीत केली. लगेचच हसन मुश्रीफ यांनीही हाच मुद्दा उचलून धरला असल्याने येथेही लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार काम होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. महाराष्ट्राची सीमा संपणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलासाठी भराव घातल्याने महापुराचा धोका वाढला आहे. येथे पिलर पूल बांधवा अशी मागणी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केली होती. तीच मागणी अलीकडे त्यांचे पुत्र खासदार संजय मंडलिक यांनी लावून धरली आहे. तर, महापुरामुळे शहर आणि ग्रामीण भागाचे मोठे नुकसान होते. त्याची झळ प्रामुख्याने हातकणंगले व शिरोळ तालुक्याला बसत असल्याने पुलाची रचना शास्त्रोक्त पद्धतीने करावी. त्याचा फटका या दोन्ही तालुक्यांना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.