कोल्हापूर : शिकाऱ्यांना शोधण्यापासून ते अमली पदार्थ, स्फोटके यांच्या शोध घेण्याची क्षमता असलेले बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वानपथक आजपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले आहे.

२६ जानेवारी पासून राष्ट्रीय कुत्र्यांसाठी प्रशिक्षण केंद्र (एनटीसीडी) इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दल पंचकुला, हरियाणा येथे २८ आठवड्यांच्या स्निफर डॉग ट्रेनिंग साठी सह्याद्री व्याघ्र राखीव मधून कु. सारिका जाधव (वनरक्षक, फिरते पथक) यांना ‘मेन डॉग हंड्लेर आणि अनिल कुंभार (वनरक्षक, पाटण) यांना सह्हायक डॉग हंड्लेर हणून पाठवण्यात आले होते. या प्रशिक्षणा करिता ट्राफिक इंडिया मार्फत ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे श्वान उपलब्ध करून देण्यात आले होते.

खडतर प्रशिक्षण घेऊन ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे श्वान – “बेल्जी” त्यांच्या डॉग हंड्लेर हे कोल्हापूर वनवृत्तातील प्रादेशिक व वन्यजीव विभाग, कोल्हापूर येथे वन आणि वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आज १५ ऑगस्ट पासून सेवा बजावण्यास सज्ज झाले आहेत.

बेकायदेशीर वन्यजीव व्यापार देखरेख नेटवर्कचा संदर्भ देताना, ट्रॅफिक म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचे व्यापार यांच्यावर देखरेख करणारी आघाडीची अशासकीय संस्था आहे. ही एक आघाडीची जागतिक अशासकीय संस्था आहे जी वन्यप्राणी , वनस्पती व्यापार करण्यावर लक्ष केंद्रित करते. ट्रॅफिक ( ट्रेड रेकॉर्ड अनालिसिस ऑफ फ्लोरा फौना इन कॉमर्स ) हा वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांचा संयुक्त कार्यक्रम आहे.

बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वान, भारतात वन्यजीव संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, शिकार विरोधी प्रयत्नांमध्ये भूमिका बजावण्यासाठी वाढत्या प्रमाणात वापरले जात आहेत. त्यांची बुद्धिमत्ता, चपळता आणि मजबूत कार्यनीती त्यांना ट्रॅकिंग, अवैध वस्तू, शिकारी शोधणे कामांसाठी योग्य बनवते. व्याघ्र प्रकल्पांमध्ये तैनात केले आहे. ते शिकार विरोधी कारवाईत मदत करतील, वृक्षतोड आणि संरक्षित प्राण्यांची तस्करी यासारख्या बेकायदेशीर गुन्हे शोध घेतील आणि गुन्हेगारीच्या घटनांच्या तपासात मदत करतील. त्यांच्या तीव्र वास घेण्याच्या क्षमतेमुळे त्यांना ड्रग्ज, स्फोटके आणि वन्यजीव प्रतिबंधित वस्तूंसह विविध प्रकारच्या वस्तू शोधता येतात, ज्यामुळे ते विविध सुरक्षा ऑपरेशन्समध्ये मौल्यवान भूमिका बजावतात.

राष्ट्रीय कुत्र्यांसाठी प्रशिक्षण केंद्र (एनटीसीडी) ही भारतातील एक प्रमुख संस्था आहे जी विविध कायदा अंमलबजावणी आणि सुरक्षा एजन्सींना कुत्रे आणि त्यांच्या हाताळकांना प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते. ही संस्था भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दल चा एक भाग आहे.

देशभरातील ८ राज्यांमधून (अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र) एकूण १४ श्वान या प्रशिक्षणात ट्राफिक इंडिया मार्फत देण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान घेण्यात आलेल्या श्वान प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेत आठ राज्यांमधून सारिका जाधव व श्वान बेल्जी यांनी प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळवला.

सह्याद्री व्याघ्र राखीवातून सारिका जाधव यांनी श्वान हाताळणारे म्हणून राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ट्रॅफिक इंडियाच्या माध्यमातून मिळालेल्या सदर प्रकारच्या श्वानाचे प्रशिक्षण पूर्ण होऊन आता ते कोल्हापूर विभागात कार्यरत झाले आहे. हे प्रशिक्षित श्वान वन व वन्यजीव संरक्षणात, विशेषतः अवैध वन्यजीव व्यापार रोखणे, शिकार प्रकरणांचा तपास व शोधमोहीम अशा कामांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. अशा अत्याधुनिक व प्रशिक्षित साधनसंपत्तीमुळे आमच्या विभागाची कार्यक्षमता आणि गती निश्चितच वाढेल, असे तुषार चव्हाण, संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव यांनी सांगितले.