कोल्हापूर : मटणाचा दर १२ सप्टेंबरपासून अचानकपणे प्रतिकिलो ४० रुपयांनी वाढवून ७६० रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मटण दरवाढ मागे घेण्याबाबत मध्यस्थी करावी, मनमानी वाढ थांबवावी, या मागणीसाठी बुधवारी इचलकरंजी येथे प्रांत कार्यालयासमोर खवय्यांनी निदर्शने केली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे पाच वर्षांपूर्वी कोल्हापुरात याच प्रश्नावर झालेल्या आंदोलनाची आठवण झाली.
आम्ही खवय्ये आणि दोस्ती ग्रुपतर्फे प्रांत कार्यालयात वरिष्ठ लिपिक विनोद वस्त्रे यांना निवेदन देण्यात आले. प्रमोद इदाते, कपिल ढवळे, किरण बुचडे, आनंदा मुसळे, नेताजी बिरंजे, कैलास म्हेतर, श्रीकांत पांडव, सचिन कांबळे, रमेश धोत्रे, जाफर जिडगे, भीमराव कोकणे, हरिदास सोनटक्के आदींसह इतर खवय्ये उपस्थित होते.
मागण्यांमध्ये मटण विक्रेत्यांची तातडीने बैठक घेऊन दरवाढ मागे घेणे, दरवाढ रोखण्यासाठी कायमस्वरूपी धोरण आखणे, ग्राहक व विक्रेत्यांमध्ये समन्वय साधून परवडणारा दर निश्चित करणे, सणानंतर जाणूनबुजून दरवाढीवर बंदी आणणे, तसेच महापालिका क्षेत्रातील नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवावी, अशा मुद्द्यांचा समावेश आहे.
इचलकरंजीत खवय्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की श्रावण महिना आणि गणेशोत्सव संपताच मटणाची दरवाढ करण्यात आल्याने ती जाणीवपूर्वक व नियोजित असल्याचा संशय आहे. सणानंतर दरवाढ करणे अन्यायकारक असून, त्यामुळे ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांवर ही अचानक दरवाढ अन्यायकारक ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. नागरिकांना तातडीने दिलासा न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. हस्तक्षेप करून तातडीने याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
पाच वर्षांपूर्वी आंदोलन
कोल्हापुरात सन २०१९ मध्ये दिवाळीच्या वेळी मटणाची विक्री ६०० रुपये किलोने झाली. मटण विकत घेणे म्हणजे हे सर्वसामान्यांसाठी कठीण झाले होते. या दराला ग्राहकांनी एकत्र येत विरोधही केला होता. पण व्यापारी किंमत कमी करत नसल्यामुळे हा पेच काही सुटत नव्हता. मटणावरून ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये वाद वाढत असल्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून एक समिती स्थापन केली. त्या समितीच्या मदतीने मटणाच्या दरावर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अखेर विक्रेत्यांनी दोन पावले मागे घेत मटणाच्या दरात घट करण्याचा निर्णय घेतला. त्याचे कोल्हापूरकरांनी स्वागत केले होते.
