कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या भुयारी वाहिन्या टाकण्याबाबतचे एक काम पूर्ण न करताच महापालिकेने संबंधित ठेकेदारास ८५ लाख रुपये दिले आहेत, असा आरोप शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) जिल्हा समनव्यक, माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. कामाच्या या अनियमिततेविषयी महापालिकेच्या प्रशासक यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी चौकशीचा आदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
कदम म्हणाले, कसबा बावडा ते बडबडे मळा या भागातील भुयारी गटार योजनेचे २ कोटी ४२ लाख खर्चाचे काम २०२१ मध्ये सुरू झाले असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यातील एक काम पूर्ण झाले नसताना महापालिकेच्या अभियंत्यांनी स्थळ पाहणी न करता, त्याची कागदोपत्री कसलीही नोंद न करताच ८५ लाख रुपये मक्तेदार श्रीप्रसाद वराळे यांनी दिले आहेत. आकाचा शोध घ्यावा. या प्रकरणात उत्तरदायी असलेले ठेकेदार, तसेच त्यांना देयक अदा करणारे संबंधित अधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. यांचा पाठिराखा ‘आका’ कोण आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे.
कृती समितीला चाप लावणार
कोल्हापूरचा विकास होऊ नये म्हणून काही सामाजिक संस्था कृती समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्या सातत्याने माहिती अधिकाराखाली माहिती मागवणे, चांगल्या कामाला ‘खो’ घालण्याची कामे करत असतात. केवळ पैसे उकळण्याच्या अशी कृत्ये करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचा निर्धार सत्यजित कदम यांनी या वेळी बोलून दाखवला.
महापालिकेतील भ्रष्ट साखळी
महापालिकेच्या कोणत्याही कामाच्या कागदपत्रावर कनिष्ठ अभियंता ते नगर अभियंता या श्रेणीने सही केली जाते. या कामातही कनिष्ठ अभियंता, एक महिला अभियंता, तत्कालीन नगर अभियंता, लेखापरीक्षक, लेखापाल अशा प्रमुखांच्या सह्या आहेत. पहिल्या कामाचे देयक आणि नंतरच्या कामाचे देयक यातील सहीमध्ये फरक आहे. त्यातून हे काम बोगस झाल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेतील भ्रष्ट साखळी कशाप्रकारे काम करते हे दिसून आले आहे. अशा प्रकारे आणखी किती कामे झाले आहेत याची मागणी त्यांनी केली.
पैसे वसूल करा
कोल्हापूर महापालिकेच्या थेट नळ पाणी योजनेच्या एका कामाचे एक काम दोन कोटी रुपये असताना त्याचे २५ कोटी रुपये अदा केले होते. याविरुद्ध आम्ही तक्रार केल्यानंतर महापालिका यंत्रणेने वरील पैसे मक्तेदाराकडून वसूल केले होते, असा संदर्भ देऊन सुनील कदम यांनी या कामातील पैसेही संबंधितांकडून वसूल केले पाहिजेत, अशी मागणी केली.